InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुलाखत: रेल्वेला विजेतेपद मिळवून देणे सन्मानाचे- सोनाली शिंगटे

मुंबईमध्ये नुकतीच तिसरी फेडरेशन कप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रेल्वे संघाने हिमाचल प्रदेशचा अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात फक्त १ गुणाने पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राची सोनाली शिंगटेने उत्कृष्ट कामगिरी करताना रेल्वे संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली.

मुंबईत राहणाऱ्या २२ वर्षीय सोनालीने अंतिम सामन्यात १२ रेडमध्ये ४ गुण आणि १ बोनस घेत रेल्वेच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला होता. या विजयानंतर महा स्पोर्ट्सला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये या स्पर्धेचा अनुभव खूप चांगला होता असे सांगताना अनेक विषयांवर तिने मनमोकळा संवाद साधला.

प्रश्न – तुझे बालपण कसे गेले आणि तुला कबड्डीची आवड कशी लागली?

सोनाली – माझं बालपण मस्त होत. मी आमच्या बिल्डिंगखाली मुलांशी कबड्डी खेळायचे. तसेच शाळेतसुद्धा कबड्डी खेळायचे त्यातूनच मला कबड्डीची आवड लागली. मी ११ वी, १२ वीला असताना एंटरटेनमेंट म्हणून कबड्डी खेळायचे.

एमडी कॉलेजला असताना मी श्री.राजेश राजाराम पाडावे सरांना भेटले. त्यानंतर माझे क्लबकडून खेळणे सुरु झाले. मी २०१४-१५ मध्ये महाराष्ट्राच्या ज्युनिअर संघाची कर्णधारही होते. घरातील सगळेच क्रीडाप्रेमी आहेत. त्यामुळे घरातून पूर्ण पाठिंबा होता. घरातून मला कधी विरोध झाला नाही .  घराची परिस्थिती तशी बेताचीच आहे. त्यामुळेच तर आम्ही मुंबईत भाड्याच्या घरात राहतो. आईने खानावळ चालवून आणि बाबांनी सिक्युरिटीचे काम करून आम्हाला सगळे दिले आहे.

प्रश्न – रेल्वे संघाकडून कधी खेळायला सुरुवात केलीस? याआधी मुंबईकडून खेळली आहेस का?

सोनाली –  मी मुंबईकडून जिल्हास्तरावर खेळले आहे. त्यानंतर माझी महाराष्ट्र संघात निवड झाली. जेव्हा रेल्वे भरतीसाठी फॉर्म निघाले तेव्हा तो फॉर्म मी भरला होता. त्यात मी मेडिकल टेस्टही पास झाले. त्यानंतर मी रेल्वेकडून खेळायला सुरुवात केली.

प्रश्न – फेडरेशन कप स्पर्धेमध्ये हिमाचल प्रदेश संघाला पराभूत करून रेल्वे संघाने विजेतेपद जिंकले, त्याबद्दल काय सांगशील?

सोनाली – जेव्हा आम्ही ते विजेतेपद जिंकले तेव्हा खूप आनंद झाला होता. आम्ही गोल्ड मेडल जिंकले होते. मागच्या महिन्यात हैद्राबादला झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेशने आम्हाला ३२ वर्षांनी हरवले होते. त्यानंतर आम्ही फेडरेशन कपमध्ये त्यांना पराभूत करून विजेतेपद मिळवले त्यामुळे छान वाटत होते. सध्या रेल्वे संघात ५ महाराष्ट्राच्या खेळाडू आहेत. मी, नेहा घाडगे, रक्षा नारकर, मीनल जाधव आणि रेखा सावंत असे आम्ही पाचजणी रेल्वेकडून खेळतो.या विजयात रेल्वेच्या प्रशिक्षक गौतमी आरोसकर यांचाही मोठा वाटा आहे.  

प्रश्न – फेडरेशन कप मुंबईत पार पडला, तर मुंबईत जिंकताना कसे वाटले?

सोनाली – अनुभव खूप मस्त होता. आम्ही जिथे प्रॅक्टिस करतो तिथेच आम्ही विजय मिळवला. त्यामुळे चांगलं वाटत होतं.

प्रश्न – तू जॉब आणि सराव यांचा ताळमेळ कसा साधतेस?

सोनाली – मोठ्या स्पर्धांच्या आधी आमचा १ महिन्याचा कॅम्प लागतो . त्यासाठी आम्हाला स्पेशल सुट्ट्या दिलेल्या असतात.आमचा कॅम्प लागला की आम्हाला चांगला सराव मिळतो. तसेच मी सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी २ तास असा सराव करते.

प्रश्न – प्रो कबड्डीमध्ये तू खेळली आहेस, तर त्याबद्दल तुझे मत काय? महिलांची लीग पुन्हा सुरू व्हायला हवी का? 

सोनाली – नक्किच, प्रो कबड्डी मध्ये महिलांची लीग पुन्हा सुरू व्हायला हवी. प्रो कबड्डीमुळे खेळाडू संगळ्यांसमोर येतात. चाहत्यांना त्यांचा खेळ पाहता येतो. नाहीतर असे अनेक चांगले खेळाडू माहीतच होत नाहीत. त्यामुळे प्रो कबड्डीची महिलांची लीग पुन्हा सुरु व्हायला हवी.

प्रश्न – तुझे आवडते महिला आणि पुरुष कबड्डीपटू कोण?

सोनाली – मला महिलांमध्ये रेल्वेची रेडर पायल चौधरी आवडते. पुरुष खेळाडूंपैकी मला पहिल्यांदा अनुप कुमार आवडत होता. आत्ता सध्या मोनू गोयत माझा फेव्हरेट कबड्डीपटू आहे.

प्रश्न – बाकी तुझ्या आवडीनिवडी काय आहेत?

सोनाली – मला गाणी ऐकायला आवडतात. मला नवीन चित्रपटही पाहायला आवडते. तसेच मी कबड्डीसोडून दुसरे खेळही खेळते. मला कबड्डी सोडला तर बॅडमिंटन हा खेळ आवडतो.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply