“फोन टॅपिंगप्रकरणात केंद्र सरकार लपवाछपवी करत आहे हे स्पष्ट झालंय”

मुंबई : इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीने पेगॅसस हे हेरगिरी तंत्रज्ञान विकसित करून जगातील 1400 मोबाईल क्रमांक हॅक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तर 300 भारतीय तसेच काही पत्रकारांचे देखील फोन टॅप झाल्याचा दावा 15 मीडिया संस्थांनी केलाय. देशभरात याप्रकणामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत केंद्र सरकारची पोलखोल केली. आता काँग्रेस नेत्या आणि महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

“लपवण्यासारखं काही नाही, तर मोदी यांनी इस्राईलला विचारून पेगाससप्रकरणी कोणाला पैसे दिले याची माहिती घ्यावी आणि ती उघड करावी, असं आव्हानच सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिलं आहे. भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी ही मागणी केल्याने केंद्र सरकार लपवाछपवी करत आहे हे स्पष्ट झालंय,” असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

“सुब्रमण्यम स्वामी यांच्याच मागणीचा भाजपने तातडीने विचार करून देशासमोर सत्य उघड करावं. स्वामी यांनी मागणी केल्याने आता सुंठीवाचून खोकला गेला असं म्हणावं लागेल. अन्यथा, काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांनी याबाबत मागणी केली असती तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करायला सरकारने मागेपुढे पाहिले नसते,” असा टोला यशोमती ठाकूर यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा