‘पंकजाताई भाजप सोडा, शिवसेनेत या’, योग्य सन्मान केला जाईल; शिवसेना मंत्र्यांची थेट ऑफर

जळगाव : पंकजाताई भारतीय जनता पक्ष सोडा, शिवसेनेत प्रवेश करा, अशा स्वरूपाची मोहीम वंजारी सेवा संघातर्फे सोशल मीडियावर चालविली आहे तर आज शिवसेनेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागत असल्याचे मत आज व्यक्त केले.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भाजप अन्याय करीत असल्याची भावना वंजारी समाजबांधवांची आहे. त्यामुळे या पक्षाचा त्यांनी तातडीने त्याग करून शिवसेनेत प्रवेश करावा, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, अशी ग्वाही गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

गुलाबराव पाटील म्हणाले, भाजपमध्ये पंकजा मुंडेंकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर माझ्याकडूनच देण्यात आली होती. आताही त्यांनी शिवसेनेत यावे. गोपीनाथ मुंडे यांचे व त्यांच्या कुटुंबाचे कार्य मोठे असून त्यांच्या वारसाला न्याय मिळावा असे समाजाला वाटत आहे.

शिवसेनेत पंकजा मुंडे आल्यास त्यांचे स्वागत आहे. त्यांना शिवसेना नक्की महत्त्वाचे स्थान देऊन त्यांचा सन्मान करेल. प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना पद काय द्यायचे हे मुख्‍यमंत्री तथा शिवसेना अध्‍यक्ष उद्धव ठाकरे ठरवतील, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा