Maharashtra । शिंदे-फडणवीस सरकारच्या ३ महिन्यांच्या काळात महाराष्ट्राने ‘हे’ ४ मोठे प्रकल्प गमावले

Maharashtra | मुंबई : C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Projec) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. IAF सौद्यांतर्गत महाराष्ट्रात सुरू होणारा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमधील वडोदरा येथे स्थलांतरित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वडोदरा येथे या प्लांटचे उद्घाटन करणार आहेत. या खुलाशानंतर विरोधकांनी एकनाथ शिंदे-भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

२२,००० कोटी रुपयांचा टाटा-एअरबस सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट (Tata-Airbus Aircraft) आता गुजरातमधील वडोदरा येथे सुरू होणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वडोदरामध्ये आलेला हा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये आणला जाईल अशी अपेक्षा होती. या एकट्या प्रकल्पामुळे राज्यात सुमारे ६००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा होती. याआधीही ३ मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात गेले.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प

महाराष्ट्रात तब्बल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून सुमारे दीड लाख नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. सेमीकंडक्टर म्हणजेच मायक्रोचीप बनवण्याचा हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी तळेगाव या जागेचा पर्याय देण्यात आला होता. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, 63 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स आणि 3800 कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्प होणार होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी माहिती MIDC कडून देण्यात आली होती. सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाची चर्चा करण्यासाठी जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फॉक्सकॉन आणि वेदांता कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक पार पडली होती. मात्र हा प्रोजेक्ट गुजरातला गेला.

बल्क ड्रग पार्क प्रकल्प

‘बल्क ड्रग पार्क’ हा प्रकल्प आपण रायगडमध्ये येणार होता. पण आता गुजरातमधील भरुच इथं हा ‘बल्क ड्रग पार्क’ होणार आहे. या प्रकल्पाची मागणी महाराष्ट्रानं पहिल्यांदा केली होती. सप्टेंबरमध्ये हा प्रकार घडला होता. सुमारे ३००० कोटी रुपयांच्या आणि सुमारे ५०००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेल्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पासाठी महाराष्ट्र हा मुख्य दावेदार यापैकी एक होता.

मेडिकल डिव्हाइसेस पार्क

औरंगाबाद येथील ऑरिक सिटी येथे 424 कोटींचा वैद्यकीय उपकरणे पार्क प्रस्तावित होता. वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्कनंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेला हा तिसरा मोठा प्रकल्प आहे. ऑरीक बिडकिनमध्ये वैद्यकीय उपकरणे पार्क उभारण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. ‘प्रमोशन ऑफ मेडिकल डिव्हायसेस पार्क’ योजनेअंतर्गत हा प्रस्ताव 2020 मध्ये केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत फार्मास्युटिकल्स विभागाकडे पाठवण्यात आला होता. रसायने आणि खते मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या योजनेकरीता एकूण 16 राज्यांनी प्रस्ताव पाठवला होता, यापैकी चार राज्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही निवडलेली राज्ये आहेत. दुर्दैवाने यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला नाही.

महत्वाच्या बातम्याः

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.