विकासाला बळकटी देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांना महाराष्ट्र मजूर पक्षाचा जाहीर पाठिंबा

भोसरी विधानसभा मतदारसंघातील कामगार, मजूर, कष्टक-यांच्या मागण्यांसाठी आमदार महेश लांडगे यांनी कायम आग्रही भूमिका घेतली. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडविण्याची त्यांना तळमळ आहे. पुढील काळात याच आग्रही भूमिकेने लढण्यासाठी तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महाराष्ट्र मजूर पक्षाने महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र मजूर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे यांनी सांगितले. भोसरी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी महाराष्ट्र मजूर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय नेते भाऊसाहेब आडागळे, पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी चव्हाण, पुणे जिल्हा समन्वयक किशोर लोखंडे, हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील शेंडगे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लालचंद आडागळे आदी उपस्थित होते.

याबाबत बोलताना भाऊसाहेब आडागळे म्हणाले, “मजूर, कष्टकरी, कामगारांच्या काही मागण्यांबाबत आमदार महेश लांडगे यांच्याशी चर्चा केली. कामगारांना मिळणारी तुटपुंजी मदत न देता त्यांच्या विविध प्रश्‍नांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. बांधकाम महामंडळाचे बजेट वाढवून मजुरांच्या आरोग्य, शिक्षण आणि पेन्शन याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, याबाबत आमदार महेश लांडगे यांनी पुढील काळात आग्रही भूमिका घेणार असल्याचे सांगितले आहे. भाऊसाहेब पुढे म्हणाले, “आमदार महेश लांडगे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष असताना अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास जागा मिळवून दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्सव त्या जागेमध्ये आज उत्साहात साजरा केला जातो. ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. त्याबाबत यापुढील काळात देखील ते आग्रही राहणार आहेत. रेशन कार्डशी संबंधित असणाऱ्या कामांसाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पुणे येथील कार्यालयात जावे लागत असे. आमदार महेश लांडगे यांनी वारंवार पाठपुरावा करून परिमंडल फ झोन कार्यालय पुण्यातून पिंपरी चिंचवड येथे आणले. याचाही सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ झाला आहे. नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेले, कामगारांच्या मदतीला वेळोवेळी धावून येणारे तरुण, तडफदार नेतृत्व पुन्हा एकदा भोसरी विधानसभा मतदारसंघाला लाभावे तसेच विकासाला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र मजूर पक्षाने आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा दिला असल्याचे भाऊसाहेब यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.