Maharashtra Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली

Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह (Maharashtra) देशामध्ये सातत्याने वातावरणात (Weather) बदल होत आहे. मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी थंडीची हुडहुडी वाढत चालली आहे. तर, राज्यातील उत्तरेकडील भागात किमान तापमान घट झाल्याने गारठा वाढत चालला आहे. नाशिक, धुळे, निफाड या ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील निफाड गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडच्या गहू संशोधन केंद्रात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर, धुळे येथील कृषी महाविद्यालयात 7.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, उर्वरित राज्यात तापमानाचा पारा 10 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान कायम आहे.

राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये तफावत असल्यामुळे सकाळच्या वेळी गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. दरम्यान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड आणि गुजरात या राज्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या राज्यांमध्ये दाट धुके दिसणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यासह उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर कायम असेल. त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये देखील किमान तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, थंडी वाढल्याने जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.