InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदी रणगाड्यावर कसे?; ‘मै भी चौकिदार हुँ’वर कारवाई करा!

भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी वापरले जाणाऱ्या ‘मै भी चौकिदार हुँ’ या गाण्यावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. या प्रचारगितात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणगाड्यावर आरूढ होऊन केलेले चित्रिकरण हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उघड उल्लंघन असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे सचिव तौफिक मुल्लाणी यांनी केली आहे.

मुल्लानी यांनी यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, मागील दोन दिवस सोशल मीडियावर ‘मै भी चौकिदार हुँ’ हे गाणे भाजपकडून प्रसारित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हे गाणे ट्वीट केले आहे. या गाण्यात नरेंद्र मोदी रणगाडयावर बसलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे या चित्रफितीमध्ये भारतीय लष्कराचे जवान लढताना देखील दाखवण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ९ मार्च २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार राजकीय पक्षांना प्रचारामध्ये भारतीय लष्कर आणि संबंधित प्रतिकात्मक छायाचित्रांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या पश्चातही ‘मै भी चौकिदार हुँ’ या गाण्यामध्ये पंतप्रधानांना रणगाड्यासमवेत दाखवून भाजपने निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. यासंदर्भात भाजपवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही तौफिक मुल्लानी यांनी केली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी याविरोधात देशाच्या प्रत्येक कृतीला आपले समर्थन असल्याचे जाहीर केले होते. एकिकडे काँग्रेस पक्ष भारतीय लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असताना दुसरीकडे देशाचे पंतप्रधान मात्र सैनिकांच्या शौर्याचे श्रेय लाटू पाहत असल्याचे यावरून दिसून येते. महागाई, बेरोजगारी, दहशतवादी हल्ले असे अनेक गंभीर प्रश्न सोडविण्यात साफ अपयशी ठरलेले हे सरकार अशा जाहिरातींच्या माध्यमातून भारतीय लष्कराचे श्रेय लाटण्याचा निंदनीय प्रकार करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव तौफिक मुल्लाणी यांनी केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.