“पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच जिंकणार!” संजय राऊत

मुंबई : देशभरात एकीकडे कोरोनाचं मोठं संकट सुरू असताना राजकीय वर्तुळात आज या निकालांची चर्चा आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना या निवडणुकांबाबत त्यांचं भाकित वर्तवलं आहे.

संजय राऊत असं म्हणाले की, “हे सगळ्यांना माहिती आहे. तामिळनाडू आणि पाँडिचेरी सोडून कुठेही सत्तापरिवर्तन होणार नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच सरकार बनवेल. केरळमध्येही सत्तापरिवर्तन होणार नाही. नंदीग्रामबाबत चर्चा काहीही होऊ देत, पण ममतादीदींचं धैर्य मानायलाच हवं. त्या दोन जागांवर लढल्या नाहीत. त्या एकाच जागेवर लढल्या. त्यांनी आव्हान स्वीकारलं. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना हरवणं सोपं नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचंच सरकार येणार.”

“भाजपानं केलेल्या व्यवस्थापनाचं कौतुक केलंच पाहिजे. त्यांनी प्रचंड मेहनत केली. देशभरातून लोकं आणली. देशाचे पंतप्रधान कोरोनाच्या संकटकाळात देखील तिथे तंबू ठोकून बसले. राज्याराज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नेऊन बसवले. पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हरवणं इतकं सोपं नाही. बहुमताचा आकडा कमी होईल कदाचित त्यांचा. पण निकाल हाती येतील, तेव्हा तृणमूल काँग्रेसचंच सरकार तिथे आलेलं असेल. भाजपाचे आकडे नक्कीच वाढत आहेत. लोकसभेतही वाढले आहेत. त्यांची मेहनतही आहे, गुंतवणूकही आहे, सगळंच आहे”, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

यावेळी संजय राऊत यांनी निवडणुकीपेक्षा कोरोनाची चिंता मोठी असल्याचं माध्यमांना सांगितलं. “निवडणुकीचं हे वातावरण दुपारपर्यंत संपून जाईल. देशभरात आजही सर्वात मोठं संकट हे कोरोनाचं आहे. देशात कुणीही कोरोनाच्या संकटात निवडणुकीवर लक्ष देत नाहीये. आम्हाला चिंता कुणाच्या राजकीय आकड्यांच्या वाढीपेक्षा कोरोनाच्या वाढीची आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि मद्रास न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, देशात कोरोनाचा प्रसार होण्यासाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. निवडणुकीचं नियोजन केलं पण गर्दी नियंत्रणात आणली नाही. त्यासाठी आपण किंमत मोजतो आहोत. देशात ४ लाखांच्यावर कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. हजारो रुग्ण मरत आहेत. ऑक्सिजन, बेड नाहीत. हे कशामुळे होतंय याचं चिंतन करण्याची गरज आहे”, असं देखील संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा