InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हिंदुहृदयसम्राट ‘बाळासाहेब ठाकरे’ यांना ‘मानाचा मुजरा’; २० जानेवारीला फक्त कलर्स मराठीवर…

महाराष्ट्राचा अभिमान असलेले, मराठी मनांवर राज्य करणारे बाळासाहेब ठाकरे यांना ‘मानाचा मुजरा’. कलर्स मराठी प्रस्तुत ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमातून राजकारण, क्रिकेट, संगीत, अभिनय अशा निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला.

बाळासाहेब ठाकरे यांना ‘मानाचा मुजरा’ या कर्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, संपूर्ण ठाकरे कुटुंबिय एकत्र उपस्थित असणं ह्या कार्यक्रमाचे विशेष औचित्य दर्शवते. सुधीर गाडगीळ, द्वारकानाथ संझगिरी, अवधूत गुप्ते यांसारख्या अवलियांच्या प्रश्नांनी कधी भावनिक करून तर कधी नर्मविनोदांनी कार्यक्रमास रंगत आणली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना सुप्रिमो उद्धव ठाकरे, युवा शिवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, विनोद कांबळी, राजू कुलकर्णी, गायक सुरेश वाडकर अभिनेता सुबोध भावे यांसारख्या विविध क्षेत्रातील रथी-महारथींना एकाच वेळी एकाच स्टेज वर स्तुत्यभाव रेखाटताना पाहण्याचा विलक्षण योग अद्वितीय आहे.

विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी अनुभवलेले बाळासाहेब आज नव्याने आपल्यासमोर उलगडण्यात आले. बाळासाहेबांच्या आठवणीत रममाण होताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युती चर्चेत येणाऱ्या अडचणींवर बाळासाहेब मोठ्या मनाने निर्णय घेत व त्यामुळे युती टिकून राहिल्याचे सांगितले.

बाळासाहेबांचे मित्र व राजकारणातील पारंगत व्यक्तिमत्त्व शरद पवार बाळासाहेबांना ‘दिलदार शत्रू’ची पदवी देत लहानातील लहान माणसाचे कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करायच्या बाळासाहेबांच्या वृत्तीची ओळख करून दिली.

एरव्ही महाराष्ट्रातील झंझावतं वादळ म्हणून ओळखले जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राटांमधील एक वडील व आजोबा उलगडताना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे भावुक झाले.

बाळासाहेबांचे क्रिकेट वरील प्रेम कधीच कोणापासून लपून राहिले नाही. वेळोवेळी बाळासाहेबांनी दिलेले धिराचे शब्द आजही हृदयात कोरले असल्याचे सांगत षटकारांचा बादशाह सुनील गावस्कर बाळासाहेबांच्या आठवणींत विलीन झाला

सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त पित्यासमान बाळासाहेबांच्या असीम प्रेमाचे दाखले देताना सांगतो की,”मी जेल मध्ये असताना जेव्हा सर्वांनी माझी साथ सोडलेली तेव्हा, ‘काळजी नसावी, मी आहे इथे’ बोलणारे साहेब एकचं होते.” ज्यांची एक झलक देखील न पाहता फक्त नी फक्त त्यांच्या आवाजाने व हृदयस्पर्शी भाषणाने त्यांच्या प्रेमात असणाऱ्या अभिनेता सुबोध भावेचे अनुभवच अनोखे आहेत.

मानाचा मुजरा’ सोहोळयादारम्यान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, दिग्दर्शक अभिजित पानसे यांसमवेत ‘ठाकरे’ चित्रपटाचे निर्माते अजित अंधारे (सीओओ, व्हायकॉम १८ studio), निखिल साने (व्यवसाय प्रमुख, मराठी एंटरटेनमेंट वायाकॉम18), राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपीच्या वर्षा राऊत, पूर्वशी राऊत व विधिता राऊत यांनी देखील उपस्थिती दर्शविली.

संजय राऊत प्रस्तुत, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स, कार्निवल मोशन पिक्चर्स आणि राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी निर्मित ‘ठाकरे’ येत्या २५ जानेवारी ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. तसेच बघायला विसरू नका ‘मानाचा मुजरा’ हा विशेष कार्यक्रम रविवार दिनांक २० जानेवारी २०१९ रोजी कलर्स मराठीवर संध्याकाळी ७ वाजता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply