शिवसेनेतून बाहेर पडून अनेक पक्षांचा जन्म झाला, पण …. ; संजय राऊतांनी काढला राज ठाकरेंना चिमटा

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा मोठा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा लहान असावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक असणारा आहे.

सरकारच्या या निर्णयाला व्यापार संघटनांनी विरोध केला असून हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. यावरून आता सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाटय़ांचे श्रेय इतर कोणी लाटू नये. ते श्रेय फक्त मनसेचे व मनसे कार्यकर्त्यांचे अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे.

यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला. शिवसेनेतून बाहेर पडून अनेक पक्षांचा जन्म झाला आहे. पण त्यांची मूळ विचारसरणी शिवसेनेचीच आहे, असा टोला राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना स्थापन केली. तेव्हापासून शिवसेना मराठीच्या मुद्द्यावर लढत आहे. मराठी अस्मिता हाच शिवसेनेचा आत्मा आहे. त्याच्याशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही, असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा