InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘निपाह व्हायरस’ पासून वाचण्यासाठी मौलवींचा अजब सल्ला

शेख अब्दुल कादीर जिलानी यांच्या नावाचा एक हजारवेळा जप करा आणि 'निपाह व्हायरस' पासून वाचा

कोझीकोड: देशभरात दहशत निर्माण केलेल्या निपाह विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शास्त्रज्ञ जंग जंग पछाडत आहेत. निपाह विषाणूमुळे नुकतेच केरळमध्ये १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. निपाह विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नसल्यानं लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. मात्र केरळमधील एका मौलवीने या विषाणूला रोखण्यासाठी अजब उपाय सांगितला आहे.

सुन्नी समुदायाचे नेते नजर फैजी कुदाथयी यांनी निपाह विषाणूला रोखण्यासाठी आध्यात्मिक उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या परिसरातील लोकांनी कुराणमधील 36 वा अध्याय वाचावा, असं कुदाथयी यांनी म्हटलं आहे. कुदाथयी सुन्नी युवजना संगम संघटनेचे राज्य सचिव आहेत. वरिष्ठ सुन्नी विद्नान वावद कुन्हाकोया मुसालीर यांनी निपाह विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी उपाय सांगितला असल्याचं कुदाथयी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे कुदाथयी यांनी

निपाहचा फैलाव झालेल्या भागात राहणाऱ्या लोकांनी धोका टाळण्यासाठी मनकूस मौलिदचा आधार घ्यावा.निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या परिसरातील लोकांनी कुराणमधील ३६ वा अध्याय वाचावा. लोकांनी शेख अब्दुल कादीर जिलानी यांच्या नावाचा एक हजारवेळा जप करावा. असं केल्यास निपाह विषाणूचा संसर्ग होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

कुदाथयी यांनी एक व्हॉईस मेसेज तयार करुन तो अनेकांना व्हॉट्सअॅप केला आहे. लोकांनी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. डॉक्टरांनी सांगितलेली काळजी घेत असताना त्याला अध्यात्मिक उपचारांची जोड द्या, असं त्यांनी म्हटलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.