मराठी पाटय़ांच्या निर्णयाचे श्रेय मनसेचे; राज ठाकरे यांचा दावा

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा मोठा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा लहान असावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक असणारा आहे.

सरकारच्या या निर्णयाला व्यापार संघटनांनी विरोध केला असून हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. यावरून आता सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाटय़ांचे श्रेय इतर कोणी लाटू नये. ते श्रेय फक्त मनसेचे व मनसे कार्यकर्त्यांचे अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे.

त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी पाटय़ांवरून शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात दुकानांवर मराठीत पाटय़ा असाव्यात यासाठी खरे तर आंदोलन करण्याची गरजच पडू नये. पण २००८ आणि २००९ मध्ये दुकानांवरील पाटय़ा मराठीतच हव्यात यासाठी मनसेने आंदोलन केले. महाराष्ट्राला जागे केले. मनसैनिकांनी खटले अंगावर घेतले आणि शिक्षाही भोगल्या. दुकानांच्या पाटय़ावर सर्वात ठळकपणे नाव मराठीत असले पाहिजे असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन, असेही ठाकरे यांनी बजावले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा