MNS on Jayant Patil | “राष्ट्रवादीची शिवसेना” ; जयंत पाटलांचा VIDEO ट्वीट करत मनसेचा खोचक टोला

MNS on Jayant Patil | मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर असंसदीय वक्तव्य केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी शुक्रवारी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर विधानभवनाबाहेर बसलेल्या विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार आणि सभापती राहुल नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पाटील यांना कोणतेही कारण नसताना निलंबित करण्यात आल्याने त्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची शिवसेना, असा उल्लेख केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. मनसेनेते गजानन काळे यांनी जयंत पाटील यांचा व्हिडीओ ट्वीट करत जोरदार टीका केली आहे. “पोटातलं ओठावर आलंच. राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना. आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना, असे जयंत पाटील म्हणाले. भास्कर जाधव यांनी सुद्धा हे मान्य केले आहेच,” असे गजानन काळे म्हणाले.

विधानसभेत काय घडले –

शिवसेना आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधानसभेत (Winter Session 2022) दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. यानंतर सभागृहात आमदारांचा गदारोळ सुरू झाला. अध्यक्षांना पाचवेळा सभागृह तहकूब करावे लागले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. विरोधकांनी देखील यावर बोलण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाचे अनेक सदस्य बोलले मात्र विरोधकांमध्ये अजित पवार सोडून कुणाला बोलू दिले नाही. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सवाल केला होता.

दिशा सालियन प्रकरणावर भास्कर जाधव यांना बोलून द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली. मात्र, अध्यक्षांनी त्यास नकार दिला. यावर अजित पवार संतापले. तुम्हाला सभागृह चालवायचे नाही का? असा सवाल अजित पवार यांनी केला होता.

आमदार भास्कर जाधव यांना सभागृहात बोलू न दिल्यामुळे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. यावेळी  ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ , असा शब्द जयंत पाटील यांनी वापरला होता. यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.