कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात मोदी सरकार अपयशी; मुंबई हायकोर्टाने फटकारलं

मुंबई : कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने फटकारलं आहे. मुंबई हायकोर्टात केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि महापालिकेला घरोघरी जाऊन ७५ वर्षांपुढील तसंच अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचं लसीकरण करण्याची सूचना देण्याची मागणी करणारी याचिका करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

यावेळी कोर्टाने केंद्राला घऱाजवळ लसीकरण
करण्याच्या धोरणासंबंधी विचारणा केली. “कोविड हा मोठा शत्रू आहे आणि आपल्याला त्याला हरवायचं आहे हे तुम्हीदेखील मान्य कराल. शत्रू काही ठराविक लोकांच्या शरिरात असून तो बाहेर येऊ शकत नाही. तुमची भूमिका सर्जिकल स्ट्राइकची असली पाहिजे”.

“सर्जिकल स्ट्राइकची गरज असताना तुम्ही सीमारेषेवर सगळं बळ एकत्र करत आहात मात्र शत्रूच्या प्रदेशात प्रवेश करत नाही. तुम्ही वाट पाहत आहात. तुम्ही लोकांच्या भल्यासाठी निर्णय घेत आहात, पण त्यासाठी फार उशीर झाल्याचं दिसत आहे. जर निर्णय लवकर घेतले असते तर अनेक जीव वाचले असते,” असंही कोर्टाने यावेळी म्हटलं.

याचिकाकर्त्यांनी यावेळी केरळ सरकारने अंथरुणाला खिळलेल्यांसाठी घरी जाऊन लसीकरणाचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. यावर कोर्टाने, “केरळ आणि इतर राज्यं ही समस्या कशा पद्दतीने हाताळत आहेत? जर यामध्ये कोणत्याही अडचणी नसतील तर इतर राज्यांमध्ये काय समस्या आहे?,” अशी विचारणा केली.

“राज्यांनी पुढाकार घेतला असताना केंद्राने मात्र अद्यापही यावर विचार केलेला नाही. तुम्ही अशा कुटुंबीयांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. अशा परिस्थितीशी तुम्ही कशापद्धतीने सामोरं जाता? अशा लोकांसाठी घरी जाऊन लसीकरण करणं हाच योग्य पर्याय आहे. मुंबई महापालिकेने आपण तयार असून तुमच्या परवानगीची वाट पाहत असल्याचं सांगितलं आहे,” असं कोर्टाने म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा