Mumbai Election। मुंबई महापालिकेवर भगवा कोणाचा फडकणार ?, शिंदे-फडणवीस की ठाकरे ?

ओमकार गायकवाड : देशातले सर्वाधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजप आणि शिवसेना पक्षात सध्या रस्सीखेच सुरु आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठा सत्ताबदल झाला. शिवसेनेतील तब्बल ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले. यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. पुढे ४० आमदार आमच्या सोबत आहेत. म्हणून आमची शिवसेना हि खरी शिवसेना आहे, असा दावा शिंदे गट करू लागलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. या दोन्ही गटांचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.

गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईतील शिवसेनेची ताकद लक्षात घेता, भाजप शिंदे गट आणि मनसेला हाताशी धरत सेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करतंय. दुसरीकडे बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांची धडपड सुरू आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेसाठी आपला बालेकिल्ला अबादित ठेवणं आता कठीण झालं आहे. तर आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्लॅन आखला आहे. आगामी काळात मुंबईतून ठाकरे सेना हद्दपार करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेनेसाठी ही करो या मरोची लढाई लढावी लागणार आहे. शिंदेंनी शिवसेनेला मोठं भगदाड पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेची नव्याने बांधणी करण्याचं आव्हान असतानाच आता महापालिका निवडणुका होणार आहेत. पण या महापकिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

ऑगस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीवरून मनसे आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचीही जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे हे दोन वेळा एकमेकांशी भेटले आहेत. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हे शिवसेनेत असल्यापासूनचे आहेत. सध्या निर्माण झालेल्या राजकीय स्थितीमुळे ते पुन्हा युतीच्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात का अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवाय मराठी मतासाठी शिंदे गटालाही मनसेसारख्या पक्षाची साथ हवीच आहे. तर दुसरीकडे सत्ता स्थापनेनंतर या दोघांमध्ये जवळीकता वाढत आहे. शिवसेनेला एकाकी पाडून मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी हे दोघेजण एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हेही मैदानात उतरले असून, 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य शिवसेनेने ठेवले आहे. तर मुंबईत गणरायांच्या दर्शनासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी 150 जागा जिंकण्याचे टार्गेट एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला दिलेले आहे. भाजपा, शिंदे गट आणि मनसे हे एकत्र आले तर जागावाटपात कुणाच्या पदरात किती जागा येतील, यावरही गणिते ठरली जाणार आहेत. माध्यमातून येणाऱ्या बातम्यांनुसार, आणि राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार येत्या मुंबई मनपा निवडणुकीत १५० जागा भाजप तर उर्वरित ७७ जागांचे दोन भागात विभाजन केले जाणार आहे. शिंदे गटाच्या वाट्याला ३० तर मनसेला ४७ जागा सोडल्या जाणार असल्याचे समजते. मात्र, युतीचा फॉर्म्युला काय असेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

शिवसेनेची रणनीती २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला २२७ पैकी ८४ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे उमेदवार ८९ प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर होते. शिवसेना विरुद्ध भाजप अशा थेट लढतीत ६२ ठिकाणी भाजप तर ४३ ठिकाणी शिवसेना जिंकली होती. या जागांवर भाजपचे विशेष लक्ष असणार आहे. एकनाथ शिंदे गटाची आणि मनसेचीही मदत घेण्यात येणार असल्याचे समजते. तर शिवसेना स्वबळावर मनपा निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी म्हणून रिंगणात उतरतील. मात्र, ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल, तेथे दोन्ही पक्ष उमेदवार देणार असल्याचे समजते, असे झाल्यास शिवसेनेला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

आता पुढे उरतात ते प्रमुख दोन प्रश्न

उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा होईल?

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सामान्य जनतेची भावनिक साद मिळत असल्याचं सोशल मीडिया आणि शिंदे गटाच्या माध्यमातून दिसून येतंय. “ज्या पक्षाने मोठं केलं, मंत्रिपदं दिली, पैसा दिला त्या पक्षाच्या प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच मुलाला दगा दिला,” अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून सोशल मीडियात दिसतात.शिवसेनेनं सोशल मीडियात तरी त्यांच्या बाजूने वातावरण राहील यांची पूर्णपणे काळजी घेतलेली दिसून येत आहे. मात्र सहानुभूती प्रत्यक्ष मतांमध्ये दिसेल का हे निकलातच कळू शकेल. उद्धव ठाकरे यांना या परिस्थितीचा राजकीय फायदा करून घेण्यात यश येईल का? यासाठी निकालाची वाट पहावी लागेल.

एकनाथ शिंदे यांच्यासाठी काय आव्हानं?

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झालेत. पण त्यांची राजकीय कारकीर्द ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. मुंबईबाहेर एकनाथ शिंदेंचं तसं फारसं राजकीय वर्चस्व नाही. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवलीत वगळता मुंबई महापालिकेत शिंदेंना मोठं आव्हान असणार आहे. पण मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपनं मारलेली मुसंडी विसरून चालणार नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या 67 माजी नगरसेवकांपैकी 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केलाय.

पण, मुंबई महापालिकेत अशी परिस्थिती नाही. मुंबईत शिवसेनेच्या एकमेव माजी नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील झाल्यात. आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर शिंदे गटात असले तरी, ठाण्यासारखे मोठ्या संख्येने नगरसेवक किंवा पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात सामील झाल्याचं दिसून आलेलं नाही. मुंबईतले शिवसेनेचे 2 खासदार अरविंद सावंत आणि गजानन किर्तीकर मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. मुंबईतील आकड्यांचं गणित पहाता मुंबई महापालिका निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी अजिबात सोपी नाही.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.