Nitesh Rane । “भास्कर जाधव खरंच शिक्षकाचे पुत्र आहेत का, हा संशोधनाचा विषय”; नितेश राणेंचा पलटवार

(Nitesh Rane) मुंबई : उद्धव ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यासह निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर देखील सडकून  टीका केली आहे. जाधवांच्या या टीकेला नितेश राणे ( Nitesh rane) यांनी प्रत्युत्तर देत चांगलाच समाचार घेतला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

“भास्कर जाधव म्हणतात मी शिक्षकाचा मुलगा आहे. मात्र मला तसे वाटत नाही. शिक्षकाचा मुलगा एवढा वात्रट निघेल, असे मला वाटत नाही. शिक्षक असलेल्या वडिलांनी त्यांच्यावर काय संस्कार केले असतील? भास्कर जाधव हे खरंच शिक्षकाचे पुत्र आहेत का, हा संशोधनाचा विषय आहे,” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर केली आहे.

भास्कर जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत नितेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव आमच्यावर भुंकण्याचं काम करुन गेलेत. गेले अनेक वर्षांपासून आम्ही बघतोय की उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणवतात. मात्र बाळासाहेबांसारखा थेट हल्ला करण्याची हिम्मत उध्दव ठाकरेंमध्ये नाही. त्यांना अशी भटकी कुत्री सोडावी लागतात. जे येऊन राणेंवर येऊन प्रहार करणार. भाजपावर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर टीका करणार आणि उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून मजा करणार, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

काय म्हणालेत भास्कर जाधव? 
“नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचे सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रदेखील विचारत नाही. शिवसेनेने काही केले नाही, असे नारायण राणे म्हणतात. मग मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस तू काय म्हशी भादरत होतास का?” अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडले. यावेळी नितेश राणेंचा एकेरी उल्लेख करत भास्कर जाधव यांनी टोला लगावला आहे. “काल नितेश राणे चिपळूणमध्ये बोलताना माझ्यावर मनसोक्त टीका करून शेवटी म्हणतो ‘माझं एवढं भाषण ऐकल्यानंतर मी लिहून देतो भास्कर जाधव घरातून बाहेर पडणार नाही, घरात लपून बसेल’. मग आज इथे आलेली ही काय तुमची औलाद आहे का?” असं भास्कर जाधव म्हणाले.नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचे सांगितले. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.