InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

लघु उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार : नितीन गडकरी

देशात आयात होणाऱ्या वस्तू ग्रामीण भागातील लघु उद्योगांच्या माध्यमातून तयार करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर सूक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा भर राहील असा विश्वास आज नितीन गडकरी यांनी या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला.

उद्योग भवन येथे श्री. गडकरी यांनी राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्या उपस्थितीत सूक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग विभागाच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला यावेळी विभागाचे सचिव डॉ. अरूण कुमार पांडा यांनी पुष्पगुच्छ देऊन उभय मंत्र्यांचे स्वागत केले.

Loading...

पदभार स्वीकारल्यानंतर श्री. गडकरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी श्री. गडकरी म्हणाले, देशात आयात होत असलेल्या वस्तू ग्रामीण भागातील लघु उद्योगांमध्ये तयार होतील व त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल व पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आयात होणाऱ्या वस्तूंची देशात निर्मिती झाल्यास देशाचा पैसा वाचेल, यासोबतच देशात निर्मित वस्तूंच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात येईल. या माध्यमातून देशातील उद्योगांना गती येईल, असेही ते म्हणाले.

कृषी क्षेत्रातील टाकाऊ पदार्थांपासून तसेच मध, बांबू आदी उत्पादनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योग गती घेतील असा विश्वास श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. देशातील लघु उद्योग बंद का पडतात याचे अध्ययन करून यावर उपाययोजना करण्यात येतील. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत महामंडळ, संस्था यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे व या संस्था सक्षम करण्यासही आपले प्राधान्य असेल असे श्री. गडकरी म्हणाले.

- Advertisement -

तत्पूर्वी परिवहन भवन येथे आज श्री. गडकरी यांनी भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. मंत्रालयाचे सचिव संजीव रंजन यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. गडकरी यांचे स्वागत केले. श्री. गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यावेळी उपस्थित होत्या.

You might also like
Loading...

Comments are closed.