सोमय्यांना कोणी सिरीयस घेत नाही; त्यांनी आधी स्वत:ची मुलं काय करतात याकडे लक्ष द्यावं : मलिक

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीतील नेत्यांवरील भ्रष्ट्राचाराचे आरोप करत पुरावे मिळवण्यासाठी धाडसत्र सुरु केलंय. आज त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणणारा दावा केला आहे. अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर आता सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत.

मुश्रीफ यांनी केलेल्या १२७ घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं . तसेच , फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले. किरीट सोमय्या म्हणाले की मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुश्रीफ यांच्यावर इन्कम टॅक्सने छापेमारी केली होती. त्यात त्यांना काही मिळाले नाही. दोन वर्ष झाली तरी या प्रकरणी कारवाई झाली नाही. आज सोमय्या ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने करत आहेत. सोमय्या यांना कोणीही सीरियस घेत नाही.’ असा टोला मलिक यांनी लगावलाय.

तसेच, ‘ स्वत:चा बडेजाव निर्माण करून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम ते करत आहे. इतरांच्या पोरांवर बोट दाखवत असताना स्वत:ची मुलं काय करतात याकडे लक्ष द्या. मुलगा कुणाला फोन करतो, कुणाला खंडणी मागतो, तुमचे नातेवाईक काय करतात, त्यांच्या किती बोगस कंपन्या आहेत, ते कसं मनी लॉन्ड्रिंग करतात हे पण लोकांना माहीत आहे.’ त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांवर पलटवार केला.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा