“राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री”, फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला 

मुंबई : विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याची घोषणा केली आणि गुरुवारी गोंधळ उडाला. यामुळे सारे निर्बंध शिथिल झाले, असं चित्र निर्माण झालं. पण असा कोणताही निर्णयच झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं. दरम्यान यावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला आहे. “ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच मंत्री बोलतात. राज्यात एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री आहेत. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असं सांगतो. प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावं,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधनं आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा