पंजशीरचे वाघ तालिबानवर पडले भारी; 300 तालिबान्यांना केलं ठार

काबुल : तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करून आठवडा उलटला आहे. गेल्या आठवड्याभरापासून अफगाणिस्तानातील परिस्थिती संपूर्ण जग पाहात आहे. आता अवघं जग आपल्या ताब्यात आल्यासारखं हे तालिबानी वागत आहेत. तालिबाननं काबुलवर कब्जा मिळवला मात्र अद्याप पंजशीर खोऱ्यावर आपला कब्जा मिळवता आलेला नाही.

तालिबाननं या खोऱ्यावर विजय मिळवण्याची मोहिम सुरु केली खरी पण पंजशीरच्या लढवय्यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली. तालिबानविरोधी शक्ती त्याच्या लढवय्यांना मोठे आव्हान देत आहेत. एकीकडे पंजशीरमध्ये दोघं लढत असताना दुसरीकडे बागलान प्रांतात तालिबानला मोठा झटका बसला आहे. एका हल्ल्यात 300 तालिबान ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे, तर अनेकांना कैद केल्याचंही सांगितलं जात आहे.

बीबीसीच्या पत्रकार यालदा हकीम यांनी ट्विट केलं आहे की, बागलानच्या अंद्राबमध्ये लपलेल्या तालिबानींवर हा मोठा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तालिबानचं मोठं नुकसान झालं आहे. तालिबानविरोधी लढवय्यांनी दावा केला आहे की, या हल्ल्यात 300 तालिबान ठार झालेत. या हल्ल्यानंतर अनेक तालिबानांना कैद केल्याचंही वृत्त आहे.

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनीही या हल्ल्याकडे लक्ष वेधले आहे. एका ट्विटच्या माध्यमातून तालिबान्यांना टोमणा मारत ते म्हणाले की, जेव्हापासून तालिबानवर मोठा हल्ला झाला आहे, त्याच्यासाठी एका तुकड्यात जिवंत परत येणे देखील एक आव्हान होते. आता तालिबानने पंजशीर खोऱ्यात आपल्या लढाऊ सैनिकांची संख्या वाढवली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा