“पवार साहेब, दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले पण…”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्या मांडल्या होत्या, या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. दरम्यान शरद पवारांनी पाठवलेल्या या पत्रानंतर भाजपकडून टीका केली जात आहे. दरम्यान भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवारांना यासंबंधी एक पत्र लिहिलं आहे.

अनिल बोंडे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली असून पत्रातून नाराजी जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री राहलेल्या शरद पवारांनी शेतकरी, शेतमजुरांबद्दल पत्रामध्ये एकही शब्द लिहला नाही असा उल्लेख करत अनिल बोंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.

“आपण जनसेवेमध्ये मग्न असणाऱ्या बार मालक, दारू विक्रेते यांना मालमत्ता कर, विजेचं बिल, अबकारी कर यामध्ये सवलत देण्याची मागणी करण्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. मुख्यमंत्री शरद पवारांचं ऐकतात म्हणून दारूवाल्यांची ही मागणी पूर्ण होईल. महाराष्ट्रातल्या १ कोटी ५० लाख शेतकऱ्यांची मागणीसुद्धा आपण मांडावी. या शेतकऱ्यांसाठी, पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा ना,” अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे.

ठाकरे सरकारने कोरोना काळात एक दमडीही शेतकऱ्याच्या खात्यात टाकले नाही अशी टीका यावेळी अनिल बोंडे यांनी केली. “महाराष्ट्रातल्या ९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीसाठी सहा हजार रुपये टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रातून सांगा,” असंही ते म्हणाले आहेत. अनिल बोंडे यांनी यावेळी कर्जमाफी, अवकाळी पाऊस, वीज बिल असे अनेक मुद्दे मांडले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा