Rain Update | राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! NDRF, SDRF च्या ६ तुकड्या तैनात

Rain Update | मुंबई : महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, चंद्रपूर आदी भागात जोरदार पाऊस झाला आहे. पुण्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. संपूर्ण शहर जलमय झाले. पुणे परिसरात भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जणू जलमय झाले होते. सर्वत्र वाहतूक ठप्प झाली. औरंगाबाद आणि चंद्रपूरमध्येही जोरदार पाऊस झाला. औरंगाबादमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला. दरम्यान राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि मुंबई-ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. प्रदेशानुसार कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून अनेक भागात गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

NDRF, SDRF च्या ६ तुकड्या तैनात-

मुंबई (कांजूरमार्ग – १, घाटकोपर – १) – २, रायगड – १, सांगली – १ अशी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण ४ पथके तैनात आहेत. तर नांदेड – १, गडचिरोली – १ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केल्या आहेत.

राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती-

राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्हे व ३८५ गावे प्रभावित झाली असून ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ३१८ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर ५८०६ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५४० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.