… तर या गोष्टी बंद करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल; राजेश टोपेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा

मुंबई : कोविडचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुमाकुळ माजवत आहे. सध्या देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. अशातच मुंबईत सध्या ५ हजार नवीन केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची चिंता आता वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळा, कॉलेज पुन्हा बंद राहणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्याच बरोबर इतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतायत. राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढत असून लोकांकडून नियमांचं पालन केलं जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असं सांगत राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात असा इशारा दिला आहे.

यानंतर सध्याची परिस्थिती पाहता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. आता या प्रश्नावर राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे. लॉकडाऊनचा परिणाम थेट अर्थकारणावर होतो. लोकांनी पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनची झळ सोसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. पंतप्रधानांनीदेखील जान हैं तो जहान है, असं सांगितलं आहे.

त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं टोपेंनी सांगितलं आहे. राजेश टोपे यांनी यावेळी निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहितीही दिली आहे. निर्बंधाच्या बाबतीत नक्कीच कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने काम करत आहोत. तरीही कोरोना नियंत्रणात आला नाही तर रेस्टॉरंट, सिनेमाहॉल, मॉल, शाळा-कॉलेजबाबत निर्णय घ्यावा लागेल, असंही टोपे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या