InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हवेतील कार्बन डाय ऑक्साईडमुळे वातावरणात बदल – रामदास कदम

हवेत कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने वातावरणात बदल होत असून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. तसेच प्लास्टिक बंदीला चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच 35 लाख कापडी पिशव्या बाजारात येतील. त्याचबरोबर 25 नद्यांचे संवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.

कदम म्हणाले, हवामान बदलामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. भूकंप, महापूर, त्सुनामी, ओला-सुका दुष्काळ, तीव्र उष्णतेचा उन्हाळा, प्रचंड थंडीचा हिवाळा, नापिकी अशा साऱ्या घटना वारंवार घडून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. इ.स. 2050 मध्ये जगभर अतिवृष्टीचा अहवाल पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे. लोकसंख्या वाढत आहे, शहरे वाढत आहेत, जंगल नष्ट होत आहेत, झाडे तोडली जात आहेत या सर्व घटनांचा परिणाम पर्यावरणावर होत असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एक किलो सिमेंट तयार करताना तसेच एक किलो कोळसा वीजेसाठी वापरताना त्यातून एक किलो कार्बन डाय ऑक्साईड हवेत पसरतो. सिमेंटच्या रस्त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. याला आपणच जबाबदार आहोत. प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड दत्तक घेऊन ते जगवले पाहिजे. हिरवा निसर्ग जिवंत ठेवायचा असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन ती झाडे जास्तीत जास्त कशी जगतील याचे नियोजन केले पाहिजे.

पर्यावरण विभागाने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगताना कदम म्हणाले, नगरपरिषद आणि महानगरपालिकांनी 25टक्के निधी सांडपाणी पुनर्प्रक्रियेवर खर्च करण्यासाठी बंधन घातलेले आहे. मिठी नदीचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून त्या परिसरात जवळपास दोन लाख झाडे लावणार आहोत. काही दिवसात मिठी नदी पर्यटन स्थळ बनेल. प्लास्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देशातील बरीच राज्ये महाराष्ट्राचा प्लास्टिक बंदीचा पॅटर्न राबविण्यासाठी पुढे आलेली आहेत. राज्यातील 25 नद्यांचे संवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. प्रदूषण करणाऱ्या 500 कंपन्या बंद केल्या आहेत. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय देण्यासाठी लवकरच 35 लाख कापडी पिशव्या बाजारात येणार आहेत. त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला 5 कोटी रुपये देणार आहोत. महाराष्ट्रातील पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी पर्यावरण विभाग कटिबद्ध असून देशातील सर्व राज्यांना महाराष्ट्राचा आदर्श घ्यावा लागेल, असे काम करणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply