घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच करोना होतो का ? दानवेंचा रोखठोक सवाल

मुंबई- परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून राज्याचा दौरा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.याच मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे. घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच करोना होतो का असा सवाल दानवे यांनी विचारला आहे. “राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

एका कार्यक्रमात बोलताना दानवे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, पण ते किती जिल्ह्यात गेले आणि आताचे मुख्यमंत्री किती ठिकाणी जाऊन आले. मला सांगू नका तुम्हीच विचार करा आणि आपापल्या गावात जाऊन सांगा. मी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, ग्रामीण, शहर सगळीकडे फिरलो. मुख्यमंत्री महोदय आम्ही म्हणतो घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी. एकट्यालाच खातो की काय कोरोना?,” अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले.वादळी पावसाने महाराष्ट्राला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापैकी काही भागांचा दौरा करावा. जेणेकरून येथील लोकांना दिलासा मिळेल. तसेच आपातकालीन व्यवस्थापनासोबत तातडीने बैठक घेऊन काय मदत करणार, हेदेखील जाहीर करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

याच मुद्द्यावरून भाजपनेते निलेश राणे यांनी एक ट्वीट करून पुरामुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच मुख्यमंत्री ठाकरे घराच्या बाहेर या आणि बघा महाराष्ट्रात काय चाललंय पण तुम्ही त्या बॉलीवूड आणि भिकारड्या राऊत च्या नादी लागला आहे. तुम्हीच तुमचं मुखपत्र सामना आणि तुमच्या PR एजन्सीला बंद करावं तरच आणि तरच तुम्हाला महाराष्ट्राची खरी परिस्थिती कळेल असं म्हटलं आहे.

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’नावावरील विश्वास उडेल,’ असा टोला बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा