Raosaheb Danve | “आधी स्वतःच्या मुलाचं नाव ‘औरंगजेब’ ठेवा, मग…”; रावसाहेब दानवेंचा जलील यांना टोला

नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला औरंगाबाद नामांतराचा प्रश्न निकाली काढण्याच्या हेतूने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला. नंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने त्याला काही काळासाठी स्थगिती दिली पण पुन्हा आम्ही लवकरच नामांतर करू असं जाहीर देखील केलं. हे प्रकरण सध्या प्रलंबित असलं तरी देखील एमआयएमचा सुरुवातीपासूनच या नामांतराला विरोध आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे सातत्याने नामांतर करण्याला विरोध करत आहेत. नामांतर करणे हा शिवसेना, भाजपचा राजकीय स्वार्थ आहे, असे ते म्हणतात. यावरूनच आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे.

“औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याची आमची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती आता पूर्ण झाली आहे. हा प्रस्ताव मंजूर करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील उपस्थित होते. त्यामुळे आता ते या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून शकत नाहीत. पण जलील हे नामांतराचा विरोध करत आहेत, त्यांना जर औरंगजेबाचा पुळका असेल तर त्यांनी आधी स्वतःच्या मुलाचं नाव ‘औरंगजेब’ असं ठेवावं आणि नंतर शहराचं नाव औरंगाबाद असं करावं”, असा खोचक टोला दानवेंनी जलील यांना लगावला आहे. तर सेना आणि भाजप विकासाचे प्रश्न आणि लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय स्वार्थासाठी औरंगाबादचं नामांतर करत आहेत. येथील अनेक स्थानिक नागरिकांनाही ते नको आहे, असं इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे.

दानवेंना यावेळी शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यात सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईविषयी विचारले असता ते म्हणाले कि, “शिवसेना विरुद्ध शिंदे गट या खटल्यात एकनाथ शिंदेंचं पारडं जड आहे. त्यामुळे यात शिंदे गटाचाच विजय होईल.” तसेच सध्या सुरु असलेल्या ईडी कारवायांवरून भाजपवर होत असलेल्या टीकांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “ईडी कारवाया फक्त भाजपच्या काळात होतायेत असं नाही. काँग्रेसच्या काळातही अशा कारवाया आणि चौकश्या झाल्या होत्या. तेव्हा आम्ही कायद्याने लढलो. पण हे फक्त तोंडानं लढतातयेत”, असा टोला त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला लगावला.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.