राऊत म्हणाले, ‘ “तो” आमदार तुमचं ऐकत नसेल तर आम्ही बंदोबस्त करतो’; आता पवारांनी केलं भाष्य

मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष सध्या राज्य सांभाळत आहे. राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भिन्न विचारसरणी असलेले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली होती. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस अनेकदा समोर आली आहे. फोडाफोडीच्या राजकारणावरून याआधी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

असाच एकप्रकार खेड (राजगुरूनगर) येथे घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी पैशाच्या आणि दहशतीच्या जोरावर पंचायत समितीचे सदस्य आपल्या बाजूने करून घेतले होते, असा आरोप करत स्थानिक शिवसेना नेते हे तीव्र नाराज होते. आता हे प्रकरण वाढलं असून खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

त्यांच्या आदेशानुसार आज शिवसेना खासदार व नेते संजय राऊत हे खेडच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची बाजू समजावून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला गंभीर इशारा दिला आहे. ‘मित्र पक्षामधील नेत्यांची कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नये असा महाविकास आघाडीतील अलिखित नियम आहे. युतीमध्ये देखील या नियमच पालन केलं गेलं होतं. मात्र, आता पुढल्यावेळी महाविकास आघाडी असेल किंवा नसेल या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार असेल. विद्यमान आमदारांना पडून आमचा आमदार येईल याची तयारी आम्ही करू,’ अशी घोषणाच संजय राऊत यांनी केली आहे.

यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांनी एकोप्याने राहायचं ठरवलंय. त्यानंतर दुसऱ्या फळीत आम्ही देखील एकमेकाला व्यवस्थित साथ देतोय. मात्र, हे खालपर्यंत रुजायला वेळ लागेल. जिथे शिवसेना-राष्ट्रवादी किंवा शिवसेना-काँग्रेस अशी लढत झाली तेथील कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. नगरमध्ये देखील आम्ही प्रयत्न केला. आम्ही तालुकास्तरावरील आमच्या नेत्यांना सांगू, शिवसेनेने देखील त्यांच्या नेत्यांना सांगावं. अशा पद्धतीने यावर तोडगा निघेल,’ असं भाष्य अजित पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा