धारावीत शून्य कोरोना रुग्ण संख्येची नोंद, महापौरांनी मानले आभार

मुंबई : कोविड 19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदा शून्य रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात तेथे एकही रुग्ण सापडला नाही. याबाबत बोलताना मंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी धारावीकरांचं कौतुक केलं. या भागातील वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या पथकाने चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

धारावीकरांचे आभार मानायला हवेत. धारावीकरांनी हे करून दाखवलंय. येथील वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या पथकाच्या माध्यमातून चांगलं काम केलं गेलं, असे महापौर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू असताना धारावी हॉटस्पॉट ठरली होती. मात्र, महापालिकेने त्यात धारावी मॉडेल राबवत रुग्णसंख्या सातवेळा शून्यावर आणली आहे.

धारावीत दाट लोकवस्ती आहे. तरीही येथील नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम’ धारावीकरांनी यशस्वी करुन दाखवली. पालिकेचे धारावी विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आणि त्यांच्या टीमने योग्य नियोजनबद्ध काम केले. धारवीकरांनी जे करून दाखवले आहे. त्यात सातत्य राखण्याची गरज आहे’, असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा