भाजपचे दावे फेटाळत महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, ‘तोपर्यंत’ धोका नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा दावा

पंढरपूरमध्ये समाधान आवताडे यांचा विजय झाल्यानंतर राज्यात आता भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर राज्यात सुरू आहे तर एकीकडे राजकारण देखील तापताना दिसत आहे. मात्र, भाजपकडून केले जात असणारे दावे फेटाळत महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, असा दावा राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या…मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो,” असे वक्तव्य केले होते. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या त्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

“राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचे हे सरकार पुढील २५ वर्ष चालेल,” असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.

दरम्यान, “पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव हा लोकांच्या नाराजीमुळे झालेला नाही. रणनीती आखण्यात महाविकास आघाडी कमी पडली. भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या आईला उमेदवारी दिली असती, तर काम सोपे झाले असते. मात्र, आम्ही हा निकाल स्वीकारला आहे,” असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.