Rishabh Pant Accident | पुढील उपचारासाठी ऋषभ पंत मुंबईतील रुग्णालयात दाखल

Rishabh Pant Accident | मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) अपघातानंतर दुखापतीवरील शस्त्रक्रियेसाठी तयार आहे. या भीषण अपघातानंतर ऋषभ पंतला क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी दूर राहावे लागणार आहे, अशी माहिती BCCI ने दिली आहे. अपघातानंतर त्याच्यावर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आता त्याला हवाई रुग्णवाहिकेद्वारे डेहरादूनवरुन मुंबईत दाखल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, असे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

क्रिकेटपटू ऋषभ पंतला हवाई रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल करण्यात आले आहे. कारण ऋषभ पंत कोणत्याही व्यावसायिक विमानातून प्रवास करण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे बीसीसीआयने त्याला हवाई रुग्णवाहिकेतून मुंबईला आणले आहे. 30 डिसेंबर रोजी पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याला सध्या उपचारासाठी मुंबईमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी एका निवेदनात म्हटले आहे,”30 डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर पंतला पुढील उपचारासाठी डेहरादूनवरून मुंबईत हवाई रुग्णवाहिकेद्वारे आणल्या जाईल. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयामध्ये त्याच्यावर पुढील उपचार होईल. स्पोर्ट्स मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि अस्थिरोगतज्ञ डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांच्या निगराणीखाली त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया देखील होणार आहे. पंतला या दुखापतीतून सावरण्यासाठी बीसीसीआय त्याला पूर्णपणे मदत करेल.”

ऋषभ पंतचा एमआरआय स्कॅनमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आढळून आली नाही. अपघातानंतर बीसीसीआय आणि डीडीए सातत्याने संपर्कात राहून त्याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवत होते. डीसीसीए प्रमुख शाम शर्मा स्वतः ऋषभ पंतची भेट घ्यायला आले होते. त्याचबरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी देखील ऋषभ पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

महत्वाच्या बातम्या