Rohit Pawar | “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना घाबरतात का?”; रोहित पवारांचा सवाल 

Rohit Pawar | मुंबई :  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत, शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वक्तव्य केलंय. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना खोचक सवाल केला आहे.

ते म्हणाले, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवा. ही व्यक्ती महाराष्ट्राला न शोभणारी आहे. एवढे दिवस ही व्यक्ती महाराष्ट्रात कशी काय राज्यपाल म्हणून राहते? त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर काही बोलत नाही. ते राज्यपालांना घाबरतात का? त्याबद्दल माहीत नाही”, असं रोहित पवार म्हणालेत.

यावेळी बोलताना त्यांनी राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरूनही टीका केली. “राज्यपालांनी पुन्हा एकदा त्यांची वैचारिक पातळी दाखवली आहे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. आम्ही त्या व्यक्तीकडे नाही, तर त्या पदाकडे बघतो. यापूर्वी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंबाबत बोलून त्यांनी त्यांची वैचारिक पातळी दाखवून दिली होती. त्यांनी तेव्हा धाडस कसं केलं? याच आश्चर्य आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलून पुन्हा एकदा त्यांनी हे धाडस केले आहे. त्याचा आम्ही निषेध करतो”, असं रोहित पवार यांनी म्हंटलंय.

शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणी बोलत असेल आपण शांत कसं बसणार? ती आपली अस्मिता आहे इतिहास आहे. शिवाजी महाराज नसते तर आपली परिस्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षाही विचित्र झाली असती. या राज्याला वैचारिक बैठक आहे ती मलीन करण्याचा प्रयत्न होतो आहे. याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.