Samana Editorial | “खोक्यांच्या बदल्यात सरकार स्थापन…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर हल्लाबोल

Samana Editorial | मुंबई: राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. ठाकरे गटात पदे विकली जातात, असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या माध्यमातून राज्य शासनावर प्रहार करण्यात आला आहे. राज्यातील मिंधे-फडणवीस सरकार घटनाबाह्य आहे, असा आरोप सामना अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

“जेथे ‘खोक्यांच्या बदल्यात सरकार’ स्थापन होते तेथे ‘पैशांच्या बदल्यात मंत्रीपद’ असा ‘लिलाव’ करणाऱ्या भामटे आणि तोतयांचीच चलती दिसणार! कर्नाटकच्या जनतेने ही भामटेगिरी ओळखून तोडून मोडून टाकली आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही तेच घडणार आहे,” अशा शब्दात सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे.

“सरकारमधील मंत्रीपदासाठी ही तोतयेगिरी केली गेली ते महाराष्ट्रातील सरकारही भामटेगिरी करूनच सत्तेत बसविलेले. त्यामुळे अटकेशिवाय सगळे कसे शांत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा यामध्ये काही संबंध असेल किंवा नसेल परंतु त्यांच्या नावाने बतावणी आणि त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना गंडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,” असंही या अग्रलेखांमध्ये म्हटलं आहे.

वाचा सामना अग्रलेख (Read Samana Editorial)

जनतेला खोट्या आश्वासनांचा गंडा घालून, बनावट राष्ट्रवादाचा ‘गंडा बांधून’ सत्तेचा शिमगा करणाऱ्यांच्या, शिवसेनाप्रमुखांचे ऋण विसरून शिवसेनेतील गद्दारांच्या मदतीने महाराष्ट्र धर्माच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या राजवटीत भामटेगिरी आणि तोतयेगिरीच फैलावणार! जेथे ‘खोक्यांच्या बदल्यात सरकार’ स्थापन होते तेथे ‘पैशांच्या बदल्यात मंत्रीपद’ असा ‘लिलाव’ करणाऱ्या भामटे आणि तोतयांचीच चलती दिसणार! कर्नाटकातील जनतेने ही भामटेगिरी ओळखली आणि तोडून-मोडून टाकली. महाराष्ट्रातही तेच घडणार आहे. कारण महाराष्ट्रातही ‘भामट्यांचे भामट्यांसाठी’ काम करीत असलेले सरकार सत्तेत आहे. नीरजसिंग राठोड प्रकरण हा त्याचाच पुरावा आहे.

राज्यातील मिंधे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असण्यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. मात्र ते भामटे आणि तोतयांचेही असल्याचा आरोप सिद्ध करणारी घटना आता घडली आहे. पैशांच्या मोबदल्यात मिंधे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळवून देतो, अशी बतावणी करणाऱ्या एका भामट्याला अटक करण्यात आली आहे. नीरजसिंग राठोड असे त्याचे नाव असून तो गुजरातमधील आहे. हा भामटा स्वतःला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा ‘पीए’ असल्याची बतावणी करायचा आणि त्याने भाजपच्या काही आमदारांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यात भाजपचेच मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे हेदेखील होते. कुंभारे यांच्याच तक्रारीमुळे हा भामटा सध्या गजाआड आहे. म्हणजे भामटा देशाचे पंतप्रधान-गृहमंत्री यांच्या राज्याचा, तो ज्यांचा टिळा लावून फिरत होता ते सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्याने ज्यांना फसविण्याचा प्रयत्न केला ते आमदारदेखील सत्तापक्षाचेच. अशा या ‘हिंमतवाला’ भामट्यांबद्दल आश्चर्य व्यक्त करायचे की ‘जैसी करणी वैसी भरनी’ असे म्हणत राज्यकर्त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे! काही महिन्यांपूर्वी गुजरातमधीलच किरण पटेल नामक एका भामट्यांचा कारनामा उघड झाला होता. नीरजसिंग राठोडने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पीए असल्याची बतावणी केली, तर किरण पटेलने पंतप्रधान कार्यालयालाच ‘हायजॅक’ केले होते. आपण ‘पीएमओ’चा अधिकारी असल्याचे सांगत त्याने थेट जम्मू-कश्मीर पोलिसांचा ‘शाही पाहुणचार’ घेतला होता. एवढेच नव्हे तर झेड-प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये निवास अशा सुविधांचा उपभोगदेखील त्याने घेतला. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यापासून

नियंत्रण रेषेचा दौरा

करेपर्यंत अनेक उपद्व्याप त्याने केले. आता हा भामटादेखील गजाआड आहे, पण प्रश्न हाच आहे की, हे भामटेगिरी आणि तोतयेगिरीचे पीक अलीकडेच देशात आणि महाराष्ट्रातही तरारून का येऊ लागले आहे? ज्या मातीत शूरवीर, क्रांतिकारक, देशभक्त, विद्वान, संत-महात्मे निर्माण झाले त्याच मातीत चोर, दरोडेखोर, ठग, लफंगे, भामटे, तोतये कसे निपजू लागले आहेत? या बदलाचा संबंध नेमका कशाशी आहे? मातीपेक्षाही ‘पेरणी आणि फवारणी’शीच त्याचा संबंध जास्त असावा. कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत मागील काही वर्षांत सर्वत्र भामटेगिरी आणि तोतयेगिरीचाच बोलबाला आहे. राजकीय गंडवागंडवी करून, फोडाफोडी करून राज्याराज्यांमध्ये सरकारे स्थापन करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून राबविला जात आहे. पोकळ घोषणा आणि आश्वासनांचे फुगे सोडून सामान्य जनतेची फसवेगिरी केली जात आहे. धर्मवाद आणि राष्ट्रवादाचे मुखवटे चढवून ढोंगीवादाला खतपाणी घातले जात आहे. सर्वत्र ही अशी ‘बोगस’ पेरणी आणि फवारणी केली जात असल्यानेच देशात भामटे आणि तोतयांची पैदास वाढली आहे का? सत्तापक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्याच नावाने त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना लाखो-करोडोंच्या बदल्यात मंत्रीपदाचे गाजर दाखविण्याचे धाडस त्यातूनच मिळत आहे का? पुन्हा हेच जर दुसऱ्या राजकीय पक्षाबाबत घडले असते तर भाजपमधील भामट्यांनी दिवट्या पेटवून राजकीय शिमगा केला असता. त्यांच्या सायबर फौजांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असता. पण येथे त्यांचाच पक्ष, त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय

अध्यक्ष, आमदार आणि भामटाही

त्यांच्याच गृहराज्यातील! शिवाय ज्या सरकारमधील मंत्रीपदासाठी ही तोतयेगिरी केली गेली ते महाराष्ट्रातील सरकारही भामटेगिरी करूनच सत्तेत बसविलेले. त्यामुळे अटकेशिवाय सगळे कसे शांत आहे. आता यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा काही दोष, संबंध असेल असे नाही, परंतु त्यांच्या नावाने बतावणी आणि त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना गंडविण्याचा प्रयत्न झाला, याचे उत्तरदायित्व तर पक्षाला घ्यावेच लागेल. नीरजसिंग राठोडची अटक हा पोलीस कारवाईचा भाग झाला. खरा प्रश्न देशात आणि महाराष्ट्रातही भामटेगिरी, तोतयेगिरी, फसवेगिरीचे पीक का वाढले आहे, हा आहे आणि तोतयेगिरी तुमच्या पक्षाच्या नावाने झाली असल्याने या प्रश्नाचे उत्तर देणे तुमचीच जबाबदारी आहे. जनतेला खोट्या आश्वासनांचा गंडा घालून, बनावट राष्ट्रवादाचा ‘गंडा बांधून’ सत्तेचा शिमगा करणाऱ्यांच्या, शिवसेनाप्रमुखांचे ऋण विसरून शिवसेनेतील गद्दारांच्या मदतीने महाराष्ट्र धर्माच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या राजवटीत भामटेगिरी आणि तोतयेगिरीच फैलावणार! जेथे ‘खोक्यांच्या बदल्यात सरकार’ स्थापन होते तेथे ‘पैशांच्या बदल्यात मंत्रीपद’ असा ‘लिलाव’ करणाऱ्या भामटे आणि तोतयांचीच चलती दिसणार! कर्नाटकातील जनतेने ही भामटेगिरी ओळखली आणि तोडून-मोडून टाकली. महाराष्ट्रातही तेच घडणार आहे. कारण महाराष्ट्रातही ‘भामट्यांचे भामट्यांसाठी’ काम करीत असलेले सरकार सत्तेत आहे. नीरजसिंग राठोड प्रकरण हा त्याचाच पुरावा आहे.

सौजन्य-सामना

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/42YhAsv