Samana Editorial | “स्वतःला हिंदुत्ववादी वगैरे म्हणून घेणाऱ्या…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र

Samana Editorial | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये काही मुस्लिम व्यक्ती प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे. तर त्याचवेळी ते त्यांच्या  कित्येक वर्ष जुन्या परंपरेनुसार देवाला धूप दाखवण्यासाठी आले होते असंही म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या घटनेवरून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे. “भाजपचे हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे. त्यांच्या विचारांना शेंडा बुरखा तर अजिबात नाही, हे त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या प्रकरणावरून सिद्ध झालं आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदुत्वाच्या नावावर दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या संयमी आणि शहाण्या जनतेमुळे हे कारस्थान पूर्ण झालं नाही.”

“स्वतःला हिंदुत्ववादी वगैरे म्हणून घेणाऱ्या पोरकट संघटनांनी मंदिराचे  शुद्धीकरण केले. मात्र, त्यांना हे अधिकार कोणी दिले? हिंदुत्वाच्या नावावर सुरू असलेला काळाबाजार बंद करा,” असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

“जगातील हिंदुत्वाचे एकमेव ठेकेदार भाजप आहे, असं त्यांना वाटतं. मात्र, या स्वयंघोषित ठोकेदारांनी आपल्या हाताखाली उपठेकेदार ठेवून देशात हिंदुत्वाच्या नावाने गदारोळ घातला आहे. हे बघून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाजपला शाप देत असतील, असही या अग्रलेखात म्हटलं आहे.

वाचा सामना अग्रलेख (Read Samana Editorial)

खरं तर हिंदुत्वाला खरा धोका त्र्यंबकेश्वराला धूप दाखविणाऱ्यांपासून नसून गोमूत्राने शुद्धीचे शिंपण करणाऱ्यांपासून आहे. आता म्हणे गृहमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरातील धूप–महाआरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची घोषणा केली. जे त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेच नाही त्याची चौकशी? हा सगळा उफराटा प्रकार आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी उतावीळपणे तो करावा हे अधिक गंभीर आहे. मुळात चौकशी करायचीच असेल तर गोमूत्राचे बॅरल घेऊन त्र्यंबकेश्वरात हैदोस घालणाऱ्या हिंदुत्वाच्या उपठेकेदारांची करा. महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला चूड लावण्याचे उपकंत्राट त्यांना नक्की कोणी दिले?

भारतीय जनता पक्षाला असे वाटते की, जगातील हिंदुत्वाचे तेच एकमेव ठेकेदार आहेत. मात्र या स्वयंघोषित ठेकेदारांनी आपल्या हाताखाली उपठेकेदार नेमून देशात हिंदुत्वाच्या नावाने जो कर्कश गदारोळ घातला आहे तो पाहता दोन्ही हिंदुहृदयसम्राट वीर तात्याराव सावरकर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाजपला शापच देत असतील. भाजपचे हिंदुत्व हे ‘गोमूत्रधारी’च आहे. त्यांच्या हिंदुत्वास ना आगा ना पिछा. विचारांचा शेंडा-बुडखा तर अजिबात नाही हे त्र्यंबकेश्वरमध्ये घडवून आणलेल्या घटनांवरून सिद्ध झाले. त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदुत्वाच्या नावावर दंगल घडवून महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटविण्याची योजना हिंदुत्वाच्या उपठेकेदारांनी योजली, पण नाशिक-त्र्यंबकच्या संयमी व शहाण्या जनतेमुळे हे कारस्थान तडीस गेले नाही. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराला संदल मिरवणुकीदरम्यान धूप दाखविण्यात आल्याचे निमित्त करून या उपठेकेदारांनी गोंधळ घातला. मुळात हे सर्व प्रकरण काय होते व हिंदुत्वाच्या उपठेकेदारांनी पराचा कावळा करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न कसा केला ते समजून घेतले पाहिजे. गुलाब शाह वली बाबा यांची मिरवणूक शहरात परंपरेने निघाली. ही मिरवणूक मंदिराच्या मार्गावरून जाते. त्यावेळी मिरवणुकीदरम्यान शनिवारी मुस्लिम समुदायातील पाच-सात युवक त्र्यंबकेश्वरास धूप दाखविण्यासाठी उत्तर प्रवेशद्वाराजवळ उभे राहिले. अशा प्रकारे धूप दाखविण्याची प्रथा तशी जुनीच आहे, पण यावेळी ‘उपठेकेदारांनी’ या धूप प्रकरणाचे भांडवल करून ‘मंदिरात मुसलमानांनी घुसण्याचा प्रयत्न केला, हिंदुत्व संकटात आल्याची’ बोंब ठोकली. यात राजकीय दबाव तंत्राचा वापर झाला. त्र्यंबकेश्वरातील ग्रामस्थांपेक्षा बाहेरचेच लोक या प्रकरणात पुढे आले आणि त्यांनी वाद निर्माण केला.

तसेच युवा मोर्चा, ब्राह्मण संघाचे पुढारी पोहोचले व त्यांनी मंदिराच्या पायऱ्यांचे, परिसराचे गोमूत्राने शुद्धीकरण केले. देवळात व बाहेर हे शुद्धीकरणाचे नाटक सुरू असताना गावात मात्र सगळय़ांनी एकत्र येऊन सलोख्याचे दर्शन घडवले. त्यामुळे गोमूत्रधारी हिंदुत्वाच्या उपठेकेदारांचे कारस्थान उधळले गेले व सगळय़ांचाच भ्रमनिरास झाला. स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणाऱ्या पोरकट संघटनांना मंदिराचे शुद्धीकरण करण्याचे कंत्राट कोणी दिले? हिंदुत्वाच्या नावावर सुरू असलेली ही काळाबाजारी दुकाने बंद केली जात नाहीत तोपर्यंत हिंदुत्वाचे हसेच होईल. भारतीय जनता पक्षाला वीर सावरकर व त्यांच्या हिंदुत्वाचा सध्या जरा जास्तच पुळका आला आहे. ऊठसूट ते वीर सावरकरांच्या हिंदुत्वाचे दाखले देत असतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे कालच्या मुंबई भेटीत म्हणे सावरकर स्मारकात गेले. सावरकरांच्या सध्याच्या कुटुंबीयांना भेटले. हे सर्व ठीक, पण सावरकरांनाही हे असले गोमूत्रधारी हिंदुत्व मान्य नव्हते. देवास मुसलमानांनी धूप दाखवला म्हणून संकटात आलेले डचमळीत हिंदुत्व सावरकरांना मान्यच नव्हते. सिंधू नदीपासून ते सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू. मग तो कुठल्याही जातीधर्माचा का असेना? मुळात हिंदू हा केवळ एक धर्म नाही, तर ती एक महान जीवनप्रणाली आहे. हिंदू धर्म हे नाव एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष आणि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची तसेच पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी व पुण्यभूमी आहे, त्या सगळय़ांचा समावेश करून घेणाऱ्या धर्मसंघाचे हिंदू धर्म हे सामुदायिक व्यासपीठ आहे, इतकी सोपी व्याख्या सावरकरांनी हिंदुत्वाची केल्याचे आढळते. त्यांचे विचार हिंदुत्वाच्या बाबतीत स्पष्टच आहेत. हिंदू धर्म हा कुठल्याही रूढी, परंपरांमध्ये, तथाकथित चौकटीत अडकून राहणार नाही. बदलत्या समाजाला पोषक होईल अशा पद्धतीने आपले स्वरूप बदलत राहणे हा

हिंदू धर्माचा स्वभावच

आहे, असे अनेक दिव्य विचार वीर सावरकरांनी हिंदुत्वाच्या बाबतीत मांडले, पण हिंदुत्वाच्या सध्याच्या स्वयंघोषित ठेकेदारांच्या डोक्यात ते कसे शिरणार? याच ठेकेदारांनी हिंदूंमधील एका वर्गास अस्पृश्य ठरवून मंदिरात प्रवेश नाकारला होता. जे आपल्याच धर्मबांधवांना अस्पृश्य ठरवून मंदिर प्रवेश नाकारीत होते त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? त्याच ठेकेदारांचे वंशज आज गोमूत्र शुद्धीकरण वगैरे भानगडीत गुंतून पडले आहेत. हिंदू धर्म हा ‘स्वयंपाकघर धर्म’ बनल्याची चिंता स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केली होती. त्याच स्वयंपाकघर प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती हिंदुत्वाच्या नावाने गोमूत्राचे बॅरल आले आहे. खरं तर हिंदुत्वाला खरा धोका त्र्यंबकेश्वराला धूप दाखविणाऱ्यांपासून नसून गोमूत्राने शुद्धीचे शिंपण करणाऱ्यांपासून आहे. याच विचारांच्या लोकांमुळे देश गुलाम झाला. पारतंत्र्याच्या बेडय़ांत अडकला. हिंदुस्थानने समाजसुधारणा, विज्ञानवादाची कास सोडली व तो दीडशे वर्षे गुलाम झाला. आता म्हणे गृहमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरातील धूप-महाआरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची घोषणा केली. या चौकशीची गरज नव्हती. ती ग्रामस्थांची मागणी नव्हती. तरीही घाईघाईने हा निर्णय जाहीर केला गेला. ही घाई, हा उतावीळपणा करण्यामागचे कारण काय, हे स्वयंघोषित उपठेकेदार सांगणार आहेत का? जे त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेच नाही त्याची चौकशी? हा सगळा उफराटा प्रकार आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी उतावीळपणे तो करावा हे अधिक गंभीर आहे. मुळात चौकशी करायचीच असेल तर गोमूत्राचे बॅरल घेऊन त्र्यंबकेश्वरात हैदोस घालणाऱ्या हिंदुत्वाच्या उपठेकेदारांची करा. महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला चूड लावण्याचे उपकंत्राट त्यांना नक्की कोणी दिले?

सौजन्य- सामना

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/41KODPm