Sambhaji raje Chhatrapati | मराठ्यांची शान असणाऱ्या मेटेंच्या जाण्याने धक्का बसला- छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचे निधन झाल्याची दुःखद घटना आज सकाळी घडली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे मेटेंच्या समर्थकांसह अनेक नेत्यांनीही या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. हा अपघात आहे कि घातपात आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीराजे यांनी देखील प्रतिक्रिया देत मेटे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले कि, “मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठ्यांची शान असणारे व्यक्तिमत्व विनायकराव मेटे आपल्यापासून दूर निघून गेले. फार मोठी दुःखद घटना असू माझ्यासाठी हा फार मोठा शॉक आहे. मेटे हे समाजावर प्रेम करणारे, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे, वीस वर्षांहून अधिक काळ आपल्या जीवाचे रान करणारे परखड नेतृत्व होते. त्यांची परिस्थिती प्रतिकूल असल्याने त्यांना स्वतःला झळ लागली होती. पण गरीब मराठा समाजाला झळ लागू नये त्यासाठी त्यांनी लढा उभारला. गरिबांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी शिवसंग्रामच्या माध्यमातून आणि प्रामुख्याने आमदार असताना विधान परिषदेमध्ये आपली बाजू परखडपणे आणि कोणताही संकोच न ठेवता मांडली. त्यांची हि पोकळी भरून काढता येणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ”

तसेच पुढे ते असेही म्हणाले, “विनायक मेटेंना आपण श्रद्धांजली कसे देऊ शकतो हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. ते गरीब मराठा समाजासाठी लढत होते. त्यामुळे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.” तसेच पुढे बोलताना त्यांनी आपत्कालीन सेवेवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर गंभीर आरोप केले. “या अपघाताची सरकारने जी चौकशी करायची आहे ती करावी. परंतु त्यांच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकारचा जबाबदार आहे. कारण अपघात झाल्यानंतर मेटे यांना एका तासाने आपत्कालीन मदत मिळाली. या सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे?मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नेहमीच रहदारी असते. त्यामुळे तिथे आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवणाऱ्या २-३ गाड्या नेहमीच असायला हव्यात. असे अपघात झाल्यास तात्काळ मदत पोहोचावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने योग्य ती तरतूद करायला हवी.”, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.