Sanjay Raut | “स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी…”; संजय राऊतांचा रणजीत सावरकरांवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गेल्या दोन दिवसांत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडून आणि इतर पक्षांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. अशातच विनायक सावरकर यांचे नातू रणजित सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी थेट पंडित नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका बाईसाठी पंडित नेहरूंनी देशाची फाळणी केली असल्याचं ते म्हणालेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रणजीत सावरकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, “पंडित नेहरूंनी काय केलं हे देशाला माहिती आहे. नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, अशफाकउल्ला खान, मौलाना आझाद, लालबहादूर शास्त्री, वीर सावरकर या सगळ्यांचं योगदान आहे.”

तसेच “कुणी सावरकरांवर प्रश्न निर्माण केले म्हणून पंडित नेहरूंवर प्रश्न निर्माण करायचे हे निदान स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी थांबवायला हवं. ही आपली परंपरा आहे”, असं म्हणत संजय राऊत यांनी रणजीत सावरकर यांना सुनावलं आहे.

पुढे ते म्हणतात, “आम्ही सगळे सावरकरांचे भक्त आहोत. आम्ही सगळे सावरकरांसाठी लढाई करतो आहोत. पण या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात, स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यात, विकासाच्या वाटेनं पुढे नेण्यात पंडित नेहरूंचं मोठं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते, तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेनं देश नेण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं आहे. नाहीतर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज जी पाकिस्तानची धर्मांध राष्ट्र म्हणून अवस्था आहे, ती नेहरूंनी भारताची होऊ दिली नाही. याबद्दल हा देश नेहरूंचा ऋणी आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते रणजीत सावरकर? 

“पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली. १२ वर्षं भारताची सर्व गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली. माझी मागणी आहे की, नेहरू-एडवीना पत्रव्यवहार ब्रिटिशांकडे मागावा आणि ते सर्व जाहीर करावं. त्यानंतरच जनतेला कळेल की, ज्यांना आपण चाचा नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फसवणूक केली”, असा दावा रणजीत सावरकरांनी माध्यमांशी बोलताना केला होता.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.