Sanjay Raut | हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीसांना आवाहन

Sanjay Raut | मुंबई: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणूक घेऊन दाखवा, असे आवाहन संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांना केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “माझ्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे एक प्रकारचे दबाव तंत्र आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यामुळे देशातील निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव भारतीय जनता पक्ष आखात आहे. कर्नाटकमध्ये कमळाच्या पाकळ्या गळाल्या आहे. हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा. जिथं ‘ऑपरेशन लोटस’ होतं तिथं भाजपाच्या पाकळ्या गळून पडतात. कर्नाटकच्या जनतेने भाजपला चांगलाच धडा शिकवला आहे.”

दरम्यान, सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र चालवण्यात आला आहे. “काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असले तरी त्यांनी निवडणुकीदरम्यान ते दिसू दिले नाही. मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा असणारे डी. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी प्रचाराची जबाबदारी हायकमांडवर सोपवून दिली होती. तर कर्नाटकमधले भाजपचे बोम्मई सरकार भ्रष्टाचार आणि लुटमारीच्या प्रकरणात पूर्णपणे बदनाम झाले होते. त्याचबरोबर प्रचार करत असताना भाजपने हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून लोकांना भरकटण्याचा प्रयत्न केला होता”, असं सामना अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

“कर्नाटकमध्ये काँग्रेसचे बहुमत इतके पक्के आहे की, भारतीय जनता पक्ष कर्नाटकमध्ये फोडाफोडी करून सत्ता काबीज करण्याचे स्वप्न देखील आता पाहू शकत नाही. कर्नाटकमध्ये भाजप महाराष्ट्रासारखा पहाटेचा शपथविधी घडवू शकत नाही. कारण कर्नाटकातील भाजपमध्ये तेवढी कुवत नाही. कर्नाटकमध्ये भाजपला विजय मिळाला असता तर त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले असते. मात्र, पराभवाचे खापर नड्डा यांच्या डोक्यावर फोडले जात आहे”, अशी खोचक टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.