Sharad Pawar | कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल स्पष्ट झालेला असून काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये राष्ट्रवादीला देखील पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तिशाली आहे अशी स्थिती नाही. मात्र, आम्ही उमेदवार उभे करून एक प्रयत्न करून पाहिला. निपाणीतील उत्तमराव पाटील या उमेदवाराला आम्ही शक्ती दिली होती. ते निवडून येतील अशी आमची अपेक्षा होती. पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये ते पहिल्या क्रमांकावर विराजमान होते. मात्र, नंतर ते दुसऱ्या क्रमांकावर गेले. एखाद्या नवीन राज्यात प्रवेश करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला होता.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करावा, हे आमचं मुख्य लक्ष होतं. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कर्नाटकमध्ये अनेक सभा आणि प्रचार केला होता. मात्र, तिथल्या जनतेने त्यांच्या मताच्या माध्यमातून भाजपचा पराभव केला आहे आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे.”

“आम्ही चमत्कार करण्यासाठी या जागा लढवल्या नाही. नवीन राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आम्ही उमेदवार उभे केले होते. निपाणीच्या एका उमेदवारावर आम्ही खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित केलं होतं”, असं स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या