Sharad Pawar | शरद पवारांचा निर्णय मागे; अध्यक्ष पदावर कायम

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. पवारांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे, अशी विनंती समितीने केली आहे. या विनंतीला मान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली आहे.

मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचा पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे. “गेल्या तीन दिवसापासून देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मला निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचे हे प्रेम बघून मी भारावून गेलो आहे. त्यामुळे मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत आहे”, असं शरद पवारांनी जाहीर केलं आहे.

शरद पवारांनी राजीनामा जाहीर केल्यानंतर पक्षातील प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला होता. तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याबाबत येत्या दोन दिवसात मी अंतिम निर्णय घेणार आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. दोन दिवसानंतर तुम्हाला आंदोलन करायची वेळ येणार नाही, असं देखील पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं.

दरम्यान, राजीनामा जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “मी जो काही निर्णय घेतला आहे, तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला आहे. भविष्यात पक्षाचं कामकाज सुरळीत चालावं त्यातून एक नवीन नेतृत्व मजबूत करावं, हा माझा हेतू आहे. हा निर्णय घेताना मी तुम्हाला विश्वासात घेण्याची गरज होती. मात्र, ते माझ्याकडून झालं नाही.”

महत्वाच्या बातम्या