शरद पवारांचं सूचक वक्तव्य; एसटीचं विलीनीकरण केलं तर…

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आदोलनाला भाजपकडून पाठींबा देण्यात आला असून भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या अनेक दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. हे दोघे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशा ठाम भूमिका काही एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी महत्वपूर्ण बैठक झाली. मात्र चार तास झालेल्या या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली होती.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी एसटी कामगारांच्या या आंदोलनावर सूचक भाष्य केलं आहे. मेळाव्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक बैठक घेतली असून त्यात काही पर्याय सूचवले होते.

तर पुढे, याआधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती. राज्य सरकारने जी ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती ती सरकारने पगारासाठी मदत केली होती. पाच राज्यांच्या वेतनाचा विचार केला तर गुजरातमधील वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे आणि इतर राज्यात जास्त आहे. तसेच एसटीच्या विलिनीकरणावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी उत्तर देणं टाळलं. मात्र त्यांनी यावर बोलताना अगदी सूचक वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्र सरकारनं शेजारच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा अभ्यास करावा त्याच सोबत एसटीचं विलिनीकरण केल्यानंतर मग इतर अनेक मंडळांचं सरकारमध्ये विलिनीकरण करावं लागेल, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. मात्र या आंदोलनावर चर्चा करून तोडगा काढता येऊ शकतो, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा