Shiv Sena । कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे, तर युवासेनेची धुरा तेजस ठाकरेंकडे? शिवसेनेत मोठे फेरबदल होणार?

Shiv Sena । मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षामध्ये उघड दोन गट पडले आहेत. बंडखोरीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी शिवेसेनेचे नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांमध्ये पक्षवर्चस्वाच्या मुद्द्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेला उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

येत्या 15 ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये कुटुंबीयांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तेजस ठाकरे यांच्या राजकारणात सक्रिय प्रवेश होणार आहे. युवा सेनेची धुरा ही तेजस ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंचीही शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. शिवसेनेची ग्राऊंडवर पकड मजबूत करण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या स्वभावाशी समरस असलेल्या तेजस ठाकरे यांना मैदानात उतरवल्यास सेनेत नवे स्फुरण, नवे चैतन्य संचारेल, शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढेल, असं मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, यातच आता मुंबई महानगरपालिकेसह अन्य ठिकाणच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करून शिवसैनिकांमध्ये पुन्हा उत्साह फुंकण्यासाठी काय काय केले जाऊ शकते. बंडखोरांना कोणते पर्याय सक्षमपणे उभे केले जाऊ शकतात, यावर भर दिला जात असून, पक्षातील विविध स्तरावरील पदाधिकारी नेते यांच्या बैठकांचे मोठे सत्र सुरू झाले आहेत. तसेच अनेकांना शिवसेना आणण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी सोपी नसणार असे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.