शिवसेनेचा राष्ट्रवादीला गंभीर इशारा अन् फडणवीसांनी केला ‘त्या’ विधानाचा पुनरुच्चार

खेड : राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष सध्या राज्य सांभाळत आहे. राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भिन्न विचारसरणी असलेले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली होती. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस अनेकदा समोर आली आहे. फोडाफोडीच्या राजकारणावरून याआधी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

असाच एकप्रकार खेड (राजगुरूनगर) येथे घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी पैशाच्या आणि दहशतीच्या जोरावर पंचायत समितीचे सदस्य आपल्या बाजूने करून घेतले होते, असा आरोप करत स्थानिक शिवसेना नेते हे तीव्र नाराज होते. आता हे प्रकरण वाढलं असून खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

त्यांच्या आदेशानुसार आज शिवसेना खासदार व नेते संजय राऊत हे खेडच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची बाजू समजावून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला गंभीर इशारा दिला आहे. ‘मित्र पक्षामधील नेत्यांची कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नये असा महाविकास आघाडीतील अलिखित नियम आहे. युतीमध्ये देखील या नियमच पालन केलं गेलं होतं. मात्र, आता पुढल्यावेळी महाविकास आघाडी असेल किंवा नसेल या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार असेल. विद्यमान आमदारांना पडून आमचा आमदार येईल याची तयारी आम्ही करू,’ अशी घोषणाच संजय राऊत यांनी केली आहे.

यामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी पुन्हा एकदा समोर आली असून संजय राऊतांच्या विधानांनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकार अंतर्गत मतभेदांनीच कोसळेल हे विधान केलं आहे. ‘आमच्या अजेंड्यावर सध्या कोरोना घालवणं हे आहे. आमच्या अजेंड्यावर आता सरकार पाडणं नाहीये. ज्या प्रकारे मी पहिल्याच दिवशी सांगितलंय, जे सध्या घडतंय, हे सरकार अंतर्गत विरोधानेच पडेल.

तेव्हा हे खरं वाटत नव्हतं. मात्र आता अंतर्विरोधाचा बोजा लोकांना जाणवायला लागलाय. समन्वयाचा अभाव आता जाणवतोय. ही तीन चाकांची रिक्षा असून तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेला जातायत. आमच्याकडे भरपूर संयम आहे. आम्ही विरोधी पक्षाचं, जनतेची गाऱ्हाणी मांडायचं काम बिनचूक पडेल. आम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नसून हे सरकार आपल्या वजनानेच कोसळेल.’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा