सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. यावेळी अनेक नाट्यमय घडामोडी साताऱ्याच्या राजकारणात आपल्याला पहायला मिळाल्या.तर सर्वात मोठा धक्का म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव. मात्र या सगळ्या घडामोडीनंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

तसेच गेल्या चारच दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेत अध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र असं न होता शरद पवार यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीच्या नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची निवड करण्यात आली. पवारांच्या या निर्णयामुळे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसल्याच बोललं जात आहे.

मात्र यानंतर आता या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देत शिवेंद्रराजेंवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजेंच्या नावाची मीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच्याकडे शिफारस केली होती. त्यामुळे ते अध्यक्ष झाले होते. पण यावेळेस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माझाच पराभव झाल्याने माझ्या सारख्यांची शिफारस कमी पडल्याने शिवेंद्रसिंहराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा टोला शिंदे यांनी शिवेंद्रसिंहराजेंना लगावला.

तसेच शरद पवार यांना मी शिवेंद्रसिंहराजेंना जिल्हा बँकेचा अध्यक्ष करु नका, असे कधीच सांगितले नसल्याचेही ते म्हणाले. माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माझ्याप्रती कार्यकर्त्यांच्या भावना शरद पवारांनी ओळखल्या. त्यामुळेच नितीन पाटील यांना अध्यक्ष बनविल्याचे शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या