Shivsena। “शिंदे, फडणवीसांची संताजी, धनाजीशी तुलना हा मावळ्यांचा अवमान”; बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेनेचं प्रत्युत्तर

नाशिक : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोगलांच्या सैनिकांना सर्वत्र संताजी,धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरे यांना सर्वत्र शिंदे फडणवीस दिसतात, असे विधान केले आहे. संताजी-धनाजी सारखा त्यांनी शिंदे-फडणवीसांचा धसका घेतला आहे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. हे विधान केवळ हास्यास्पद नव्हे तर मराठी इतिहासाचा अवमान आहे, अशी टिका शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhari) यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाल्यामुळे ते दुसरं काही बोलत नाहीत. त्यांच्याकडे दुसरी कॅसेट नाही. म्हणून शिंदे शिंदे शिंदे सुरू आहे. मोगलांना संताजी धनाजी जसे पाण्यात दिसत होते तसे आता उद्धव ठाकरेंना फडणवीस-शिंदे दिसतात. खिडकीत बघतात तेव्हा त्यांना शिंदे-फडणवीस दिसतात, जेवायला बसतात तेव्हा शिंदे-फडणवीस दिसतात, कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे-फडणवीस दिसतात, संताजी-धनाजी सारखा त्यांनी शिंदे-फडणवीसांचा धसका घेतला आहे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, संताजी घोरपडे, धनाजी जाधव हे निष्ठांवत मावळे होते. शिंदे हे फुटीर तर फडणवीस फुटीरांना पाठींबा देणार आहेत. फुटीरांचे समर्थन करता करता बावनकुळे यांचा वैचारीक स्तर घसरलेला दिसतो. अशा शब्दात चौधरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत सुनावलं आहे.

काय म्हणालेत बावनकुळे?

महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरेंनी फेसबुकवर चालवलं होतं, ते कधीच मंत्रालयात गेले नाहीत, मंत्री निरुपयोगी होते, ते काय सांगणार, उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मतं देणं आहे, उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे राष्ट्रवादीला मतं देणं आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21व्या शतकातील सर्वमान्य नेते असून आता ते जगातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकर मोदींवर टीका करत आहेत, असा टोला त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे. आंबेडकर यांनी कुणासोबत जायचं आणि नाही जायचं हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. ज्यांनी अडीच वर्षात काहीच विकास केला नाही. त्यांच्यासोबत आंबेडकर जाणार आहेत का याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.