ShivSena | विधवा महिलेच्या विरोधात निवडून आला होता शिवसेनेचा पहिला आमदार, आता संस्कृतीच्या गप्पा का?

भाजपने अर्ज मागे घेतल्यामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri East By-Election) आता बिनविरोध होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना (ShivSena of Uddhav Thackeray) आमने-सामने होती. अंधेरी पूर्व मध्ये आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे जागा रीक्त झाली. या जागेवर शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपने देखील या ठिकाणी उमेदवार दिला होता. मुरजी पटेल (Murji Patel) यांना भाजपने उमेदवारी दिली होती. एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) (बाळासाहेबांची शिवसेनेचा) त्यांना पाठिंबा होता. मात्र राज ठाकरे,(Raj Thackeray) शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे धडे देत निवडणूक बिनविरोध करावी म्हणून भाजपला विनंती केली. शिवसेनेने देखील राजकीय संस्कृतीच्या गप्पा मारल्या. दरम्यान शिवसेनेला तो अधिकार आहे का, शिवसेनेने यापूर्वी सहानुभूती जपली आहे का?, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या जागी घरचा सदस्य निवडणूक लढवत असेल तर ती निवडणूक बिनविरोध करावी, अशी महाराष्ट्राची परंपरा असल्याचे विरोधी नेत्यांनी म्हटले होते. शिवसेना आमदार अनिल परब (Shiv Sena MLA Anil Parab) यांनी देखील विधवा महिलेविरोधात उमेदवार दिल्यामुळे भाजपवर टीका केली होती. तसेच निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. विधवा बाई निवडणुकीत उतरते, तेव्हा सहानुभूतीचं धोरण दाखवण्याऐवजी तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता, असे परब म्हणाले होते. या सर्व प्रकरणामुळे शिवसेनेचे सोयीसाठी असलेले राजकारण समोर आले आहे. शिवसेनेला समाज, विधवा महिला, सहानुभूतीच्या गप्पा मारण्याचा अधिकार नाही कारण शिवसेनेचा पहिला आमदार एका विधवा महिलेच्या विरोधात निवडून आला होता.

…तेव्हा महाराष्ट्राला राजकीय संस्कृती नव्हती का?-

आधी अनिल परब काय म्हणाले होते ते समजून घ्या, “महाराष्ट्रात संस्कृती वेगळी आहे, एखाद्या आमदाराच्या निधनानंतर त्यांच्या घरचे निवडणुकीला उभे राहिले की ती बिनविरोध करतात. विभागप्रमुख म्हणून मी वारंवार आवाहन करतोय. एका महिलेवर दुःखाचा डोंगर, अतिशय कमी वयात आमचा रमेश गेला. एका दिवंगत आमदाराच्या पत्नीला मतासाठी बाहेर फिरावं लागणं ही आपली संस्कृती नाही.” एकंदरीत अनिल परब यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांची ही मागणी होती. म्हणजे शिवसेनेचा रोख निवडणुकीत उमेदवार देणाऱ्या भाजपवर होता. मात्र या शिवसेनेने जेव्हा आपला पहिला उमेदावर एका विधवा महिलेच्या विरोधात निवडून आणला होता. तेव्हा महाराष्ट्राला राजकीय संस्कृती नव्हती का?, असा प्रश्न निर्माण होत आहे.

कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खून-

१९६७ साली ते लालबाग परळ मधून आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई (Comrade Krishna Desai) महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले होते. त्यांनी चारवेळा महानगरपालिकेची निवडणूक देखील जिंकली होती. मात्र ५ जून १९७० ची रात्र त्यांच्यासाठी शेवटची रात्र ठरली. मध्यरात्री कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत असताना काही जणांनी त्यांना बाहेर बोलावले आणि गुप्तीने सपासप वार केले. यामध्ये कृष्णा देसाई यांचा मृत्यू झाला (Murder of Krishna Desai). त्यांच्या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. या खुनाचे थेट आरोप शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंवर (Balasaheb Thackeray) झाले होते. बाळासाहेब ठाकरेंनी हे आरोप फेटाळले होते. मात्र या प्रकरणात तीन शिवसैनिकांना १४ वर्षांची शिक्षा झाली होती. बाळासाहेबांचा संबंध नसला तरी शिवसेनेचा या खुनाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले होते. पुढे बाळासाहेबांनी देखील यावर भूमिका स्पष्ट केली होती. मात्र कृष्णा देसाई यांच्या खूनानंतर या ठीकाणी झालेल्या पोटनिवडणूकीबाबत जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण आता अंधेरी पोटनिवडणुकीत आणि तेव्हा परळमध्ये शिवसनेची भूमिका एकदम विरोधी होती.

विधवा महिलेच्या विरोधात शिवसेनेने पोटनिवडणूक लढवली-

बीबीसी मराठीने दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर १९७० रोजी परळच्या जागी पोटनिवडणूक होती. या निवडणुकीत कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई (Sarojini Desai) यांना उमेदवारी देण्यात आली. आता अंधेरीची परिस्थीती आहे तशी तेव्हा परळची परिस्थिती होती. मात्र तेव्हा शिवसेनेची भूमिका वेगळी होती. शिवसेनेने तेव्हा विधवा सरोजिनी देसाई यांच्या विरोधात परळमधून नगरसेवक असलेले बाळासाहेबांचे विश्वासू वामनराव महाडिक (Vamanrao Mahadik) यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी डावे विरुद्ध शिवसेना (Shivsena) अशी लढाई रंगली होती. शिवसेनेने त्यावेळी २८ सभा घेतल्या होत्या. यातील १५ सभांमध्ये बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. त्यांनी डाव्यांवर प्रहार केला होता. तर सरोजिनी देसाई यांना पाठींबा देण्यासाठी सर्व डावे पक्ष एकवटले होते. १३ पक्षांनी त्यांना पाठींबा दिला. त्यांचा विजय देखील निश्चित मानला जात होता. २० ऑक्टोबर १९७० रोजी संध्याकाळी निकाल जाहीर झाला आणि सर्वांची झोप उडाली. सरोजिनी देसाईंना २९  हजार ९१३  मतं, तर शिवसेनेच्या वामराव महाडिकांना ३१ हजार ५९२ मतं मिळाली. १६७९ मतांच्या फरकाने वामनराव महाडिक विजयी झाले, अशा प्रकारे शिवसेनेने एका विधवा महिलेच्या विरोधात निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यामुळे आता शिवसेनेला संस्कृती आणि सहानुभूतीच्या गप्पा मारण्याचा अधिकार नाही.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.