Shivsena । येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे; शिवसेनेचा सामन्यातून हल्लाबोल

मुंबई : शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आता निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला आहे. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं आहे. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना मुखपत्र सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधण्यात येत आहे.

नेमकं काय म्हंटल आहे सामना अग्रलेखात?

मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवटय़ामागे भ्रष्ट, बेइमान गेंडय़ाची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंडय़ाची कातडीही जळून जाईल. छे छे! यांना जाळायचे कसे? ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, ‘येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे!’ त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील! हे राज्य श्रींचे आहे. शिवरायांचे आहे. शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार?

सत्याला आणि खुनाला वाचा फुटतेच असे म्हणतात, पण मिंधे-फडणवीस युगात असत्यालाही वाचा फुटू लागली आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी केली. या अन्यायाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राचे मन पेटून उठले असताना मिंधे गटाचे प्रवक्ते व राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य व न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे. जगात न्याय आहे असे केसरकरांसारख्या बाजारबुणग्यास वाटणे साहजिकच आहे. कारण हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही. अनेक पक्षांत फिरून हे महाशय शिवसेनेत आले व मंत्रीपदाचे गाजर दिसताच मिंधे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेवर दिल्लीचा आघात म्हणजे महाराष्ट्राचा घात हा स्वाभिमानी विचार त्यांच्या मनालाही शिवणार नाही.

भारतीय जनता पक्ष व त्यांचे सध्याचे सूत्रधार हे नामर्द आहेत म्हणून त्यांनी थेट लढण्याऐवजी शिवसेनेचे अस्तित्व कागदोपत्री संपविण्याचा दळभद्री प्रकार केला. त्यांना मुंबईवर ताबा मिळवायचा आहे. आम्ही सांगितले, ‘मुंबई महाराष्ट्राची व महाराष्ट्र देशाचा आहे. मुंबईवर ताबा मिळविण्यापेक्षा चीनने गिळलेल्या लडाख, अरुणाचल प्रदेशातील जमिनीवर ताबा मिळवा.’ आम्ही सांगितले, ‘मुंबई देशाचे पोट व तिजोरी भरतच आहे. मुंबईचे काय घेऊन बसलात? आधी पाकव्याप्त कश्मीरचा ताबा घेऊन वीर सावरकरांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करा. तुम्हाला शिवसेनेचा पराभव करता येणार नाही. जनतेचे विराट सैन्य आमच्या पाठीशी आहे.’ पण त्यांची समोरासमोर लढण्याची हिंमत झालीच नाही. त्यांनी मिंधे गटाच्या बृहन्नडांना, शिखंडींना पुढे करून शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला. महाराष्ट्र त्यामुळे आकांत करीत आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.