‘…त्यामुळे माझ्यात आणि नसीरमध्ये ‘ही’ तफावत कायम राहणार’; नाना यांनी सांगितला नसीरुद्दीन शाहसोबतचा किस्सा

मुंबई : ‘कोण होणार करोडपती’ या मराठी रिअॅलिटी शोमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काही दिवसांपूर्वी हजेरी लावली होती. खेळ खेळताना नानांनी नीरज पांडे दिग्दर्शित ‘अ वेडनस्डे’ या चित्रपटाचा किस्सा सांगितला.

या चित्रपटातील नसीरुद्दीन शाह यांची भूमिका नाना साकारणार होते. पण त्यांना ही भूमिका का मिळाली नाही, त्यामागचं कारण नानांनी शोमध्ये सांगितलं. त्याचसोबत एक कलाकार म्हणून नसीरुद्दीन आणि त्यांच्यात कोणती तफावत कायम राहणार, याबद्दलही नाना मोकळेपणे व्यक्त झाले.

“अ वेडनस्डे’मधील अनुपम खेरची भूमिका नसीर करणार होता आणि मला नसीरची भूमिका मिळणार होती. मात्र सेटवर मी ओरडतो, मारतो अशा काही विचित्र गोष्टी दिग्दर्शक नीरज पांडेला समजल्या होत्या. त्यामुळे ती भूमिका मला मिळाली नाही. पण नसीरने ती भूमिका उत्तमरित्या साकारली. नसीर आणि मी समकालीन आहोत. एखाद-दोन वर्षे इकडे-तिकडे असेल. नसीरला सगळ्या चांगल्या भूमिका मिळायच्या आणि मला त्याचा फार हेवा वाटायचा. माझ्यात काय असं नाही जे त्याच्यात आहे, असा मला प्रश्न पडायचा.” असं नाना म्हंटले

पुढे नाना म्हणले की, “नसीर माझ्यापेक्षा मोठा का, तर नाटक हा माझा छंद होता आणि नाटक हा त्याचा ध्यास होता, त्याचं जगणं होतं. त्यामुळे माझ्यात आणि नसीरमध्ये ही तफावत कायम राहणार. नसीर कायम वर राहणार आणि मी कायम खाली. हळूहळू आम्ही ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न करू पण तरीसुद्धा त्याच्या पातळीवर जाणं मला कठीण आहे”, असं नाना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा