InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आमच्या टिंगलीतून काही चांगलं दिले जाणार असेल तर आम्ही त्याचाही आनंद घेतो : शरद पवार

‘झिपऱ्या’ च्या स्पेशल शो मध्ये निर्मात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

- Advertisement -

पुणे – बूट पॉलिश करून शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ‘झिपऱ्या’ची निर्मिती संस्था ए.आर.डी. प्रॉडक्शन्सच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. निमित्त होते ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारीत ‘झिपऱ्या’ या आगामी मराठी चित्रपटाच्या स्पेशल शो चे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर, साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, निर्मात्या अश्विनी रणजीत दरेकर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेच्या संज्ञापन व वृतपत्र विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला बर्वे, दिग्दर्शक केदार वैद्य, अभिनेता सक्षम कुलकर्णी, चिन्मय कांबळी, प्रवीण तरडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बूट पॉलिश करून शिक्षण घेणाऱ्या विशाल किसन उतेकर आणि विकास किसन उतेकर या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

साधू यांच्या साहित्याचा गौरव करताना शरद पवार म्हणाले, अमरावती जिल्ह्यातील अचलपुरहून मुंबईत येऊन खऱ्या अर्थाने ते मुंबईकर झाले. मुंबई कुणालाही उपाशी ठेवत नाही. ती कायमच उत्साह देते. साधू यांनी मुंबई मध्ये जे अनुभवलं त्याचे उत्तम शब्दांकन करत दर्जेदार साहित्य निर्मिती केली आणि मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या सिंहासन चित्रपटावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांची केबिन, बंगला चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून राजकारण्यांची काहीशी टिंगल करण्यात आली होती, मात्र आमच्या टिंगलीतून काही चांगलं दिले जाणार असेल तर त्याचाही आम्ही आनंद घेतो असेही पवार यांनी नमूद केले.

तसेच साधू यांना ज्याबद्दल आस्था होती, त्यासाठी ग्रंथाली आणि साधू परिवार पाठ्यवृत्तीच्या माध्यमातून कृतिशील पावले उचलत आहे याचा आनंद वाटतो. ‘झिपऱ्या’ सिनेमाच्या निमित्ताने साधु यांचे साहित्य आणि त्यांचे स्मरण पुढील पिढ्या करतील असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान या प्रसंगी अरुण साधू स्मृती जतन समिती आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेच्या संज्ञापन व वृतपत्र विभागाच्या वतीने साधू यांच्या स्मृतीदिनामिमित्त जाहीर करण्यात आलेल्या फेलोशिपची माहिती खासदार कुमार केतकर यांनी दिली. तर सामाजिक बांधिलकी जपण्याची शिकवण आणि वाचनाचे संस्कार बालपणातच झाले त्यामुळेच आज ‘झिपऱ्या’ सारख्या साहित्यकृतीवर चित्रपट निर्माण करू शकल्याची भावना निर्मात्या अश्विनी रणजीत दरेकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले.

शरद पवार यांनी सपत्निक लुटला सिनेमाचा आनंद

राजकारणी लोकांना स्वःतासाठी, कुटुंबीयांसाठी कधीच वेळ मिळत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे त्याला कसे अपवाद ठरतील? प्रतिभाताई आणि शरद पवार मोजक्या कार्यक्रमांना एकत्रित हजेरी लावतात, तसेच पवार साहेब आणि सिनेमा असे चित्र आजपर्यंत कधी पाहायला मिळाले नाही, मात्र सोमवारी त्यांनी एकत्रित अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारीत ‘झिपऱ्या’ या सिनेमाचा आनंद लुटला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, यशवंतराव गडाख, माजी आमदार उल्हास पवार, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, हणमंतराव गायकवाड, आय. ए. एस. अधिकारी आनंदराव व्ही. पाटील, अनिल शिदोरे, प्रकाश मगदुम, सतीश जकातदार, डॉ. सतीश देसाई, सचिन इटकर, सुनील महाजन, ऍड. केदार सोमण, उज्वल निरगुडकर यांच्यासह राजकीय, सिनेमा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.