InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

वरळी ते वाल्हा : सुप्रियाताईंचे ड्रायव्हर पोपटमामांनी गाठलेला १४० मैलांचा पल्ला !

पोपट शितोळे दौंड तालूक्याच्या नानगांवमधल्या गरीब घरचा १४-१५ वर्षांचा पोरगा. गरिबाला कंटाळून एक दिवस त्याने एस.टी. धरली आणि सरळ मुंबई गाठली. त्याकाळी देखील पोट भरण्यासाठी , नशीब अजमावण्यासाठी मुंबई हीच सगळ्यांची आई होती. पण मुंबा आई ह्या लेकराला पटकन कुशीत घेईना. पहिले काही दिवस तर पोपटला अक्षरश: रस्त्यावर झोपायची पाळी आली. त्याच भागात एल्फिन्स्टन रोडजवळ एका बैठ्या चाळीत एकेका खोलीत ८-१० कामगार एकत्र राहत. गरीब गोऱ्या गोमट्या पोपटची दया येऊन साताऱ्याच्या एका तरूणानं त्याला चाळीतल्या गाळ्यात आधार दिला.

पोपटचा मुंबईत जगण्याचा संघर्ष सुरू झाला होता. पोटासाठी पडेल ते काम करावं लागणार होतं. सुरूवातीला एका लहानश्या हॉटेलात ग्लास विसळण्याचं , गिऱ्हाईकाला चहा-पाणी देण्याचं काम केलं. पोपटच्या पोटाची खळगी त्या हॉटेलमधल्या भेळ आणि चण्यानं अर्धवट भरली जायची. उरलेली पोकळी पाण्यानं कशीबशी भरुन निघायची. लवकरच पोपटची नारायण नावाच्या एका मुलाशी मैत्री झाली. नारायणचे मूळ गांव पुरंदर तालुक्यातले वाल्हा पण तो वडलांसोबत मुंबईतच राही. नारायणचा घरचा उद्योग होता गाढवं पाळण्याचा. मुंबईत त्याकाळी गाढवं पाळली जात यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण गाढवं पाळली जायची. गाढवीनीचं दूध लहान मुलांच्या आजारावर उपायकारक असल्याने त्याला चांगली मागणी असायची. (माझ्या नंतर वाचनात आलं की , गाढविणीच्या दुधात लायसोझाइम आणि लॅक्टोफेरीन हि प्रतिजैविके मोठ्या प्रमाणात आढळतात. जंतूसंसर्ग टाळण्यासाठी लहान मुलांसाठी उत्तम औषध आहे.)

नारायणच्या सोबतीने पोपटला पैकं कमावण्याची एक संधी चालून आली. एका गाढविणीचं पिलू मोठं झालं तसं दूध आटलं म्हणून नारायणच्या बापानं त्या गाढविणीला पिल्लासहीत वाल्हा ह्या पुरंदर तालुक्याच्या गावी सोडायला सांगीतलं. नारायण सोबतीला राहणार होता. आणि वर पोपटला दोन गाढवं सोडायचे पंचवीस रूपये मिळणार होते. ठरलं ! पोपटनं पंचवीस रूपयासाठी गाढवं सोडायचं ठरवलं. गाढविणीच्या पाठीवर गोणपाटाचं खोगीर होतं. त्यात एक चादर, धोतर , लेंगा आणि जूनी बंडी ठेवली. पोपट अंगात चट्टयापट्टयाची पातळ चड्डी आणि बनियन अशा तोकड्या कपडयांत भल्या सकाळी गाढवं घेऊन निघाला. त्याकाळी वाशीचा खाडी पूल नव्हता. ठाणा मार्गे पनवेल गाठावं लागायचं. संध्याकाळपर्यंत पोपट, नारायण आणि दोन गाढवं पनवेलला थकत-भागत पोचली.

​गाढवं चोरी जाऊ नये म्हणून त्यांनी बाजाराच्या जागेत रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले. गाढवं दाव्यानं जवळच बांधली. झोपायचं जागसूद होतं पण दिवसभर चालून दमलेले दोघे अगदी घोडे विकून झोपल्यासारखे गाढ झोपले. मध्यरात्र उलटून गेल्यावर मात्र पोपटला गाढवाच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. पण डोळे उघडून पाहतो तर गाढविण जाग्यावर नव्हती. घोडे विकून झोपले आणि गाढव हरवले अशी दोघांची अवस्था झाली.पोपट आणि नारायणच्या उरात गाढविण हरवल्याची एकच धडकी भरली. रात्रीच्या अंधारात येणाऱ्या आवाजाचा मागोवा घेत दोघे निघाले. अर्ध्या –पाऊण तासानं आवाजाच्या उगमा पर्यंत पोचले. पण तिथे नारायणची गाढविण दिसत नव्हती. एक वेगळंच रेंकणारं गाढव होतं. दोन्ही पोरांनी निराशेनं मान खाली टाकली. पण पुन्हा थोडं दूर खिंकाळण्याचा आवाज आला. नारायणला पाहून काही मीटरवर अंधारात गाढविण फुरफुरत होती. शेवटी जनावरच ते ! पिलू असताना देखील नव्या गाढवाच्या आकर्षणाने गाढविणीचं पाऊल चुकलं होतं. पण उशीरानं का होईना गाढविण भानावर आली. आणि पोरांच्या जीवात जीव आला.

दूसरा दिवस उजाडला तशी पोरांची गाढविण आणि पिलासोबत पायपीट सुरू झाली. जेवणखाणं म्हणजे सोबत आणलेला चिवडा होता. पण चिवडा वाल्ह्याला पोचेपर्यंत पुरवायचा होता. वाटेत जांभळीच्या झाडांनी साथ दिली. दोघांनी झाडावर चढून फांद्या गदगदा हलवल्या आणि खाली जमिनीवर जांभळांचा सडा पडला. दोन्ही पोरांनी पोटभरून जांभळं खाल्ली आणि गाढविणीच्या खोगीरात जमतील तेवढी कोंबली. वाटेत एका कुणब्याच्या शेतातली तंबाटी तोडली. गाढविण आणि पिलाने वाटेवरच्या रानातल्या चाऱ्यावर पोटं भरली. आणखी तासभर चालून झाल्यावर एका ओढ्याच्या काठी चारही जण पोटभरून पाणी प्याले. पोपटने कालपासून अंगात असलेले बनियन आणि चट्टयापट्टयाची चड्डी पाण्यात धुवून घेतली. आणि तिच कापडं पिळून पुन्हा अंगावर चढवली. उन्हाचा पारा वाढत जाईल तसे कपडे अंगावरच वाळवण्याचा बेत करण्याचे कारण वेळ वाचवणे हे होते. कारण संध्याकाळ होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत घाटपायथा गाठायचा होता. घाटाची चढण रात्रीच पार करायची होती. उन्हाच्या काईलीत ते शक्य नव्हतं. त्यामुळे रात्री झोपण्याचा प्रश्नच नव्हता. तरी ह्या चार वाटसरूंनी घाटपायथ्याला एका मोठ्या झाडाखाली काही काळ विश्रांती घेतली.

दिवस पुरता मावळला. गडद अंधार पडला पण काही वेळानं चंद्रराजानं अंधाराचं साम्राज्य ताब्यात घेतलं आणि पोरांचा वाटाड्या झाला. बोरघाटाची चढण सोपी नव्हती. पोरं काटक होती. वळणावळणाच्या डांबरी घाटरस्त्याची तापी गेली होती. त्यामुळे पोरं गर्दभांसोबत अंधारातून झरझर पावलं टाकीत निघाली. रात्रीच्या मंद वाऱ्याची थंड झुळझुळ आल्हाददायक वाटत होती. अंगात जोश होता तरी पण हळूहळू पोरांची पावलं थकली. गाढविणीत दम शिल्लक होता पण तिचं पिलू पार थकलं. त्यानं तासाभरात अंग दुमडून खाली लोळण घेतलं तेव्हा सगळ्यांनी पाच-दहा मिनिटांची उसंत रस्त्याच्या बाजूला घेतली. पण रात्रीचं फार काळ एके ठिकाणी थांबणं धोक्याचं होतं. रानटी जनावराचं भय होतं. त्या धास्तीनं पोपट उठला. नारायणनं उठून गाढविणीला चुचकारलं. पिलू मात्र निघेना. मग पोपटनं पिलाचं मागचं पाय उचलून धरून पिलाचा चालण्याचा भार कमी केला. पिलू पुढच्या दोन पावलांवर मजेत निघालं. पण पोपटला मात्र ह्या कसरतीनं चांगलंच दमवलं. शेवटी पहाटेचा घाट सर झाला. दोघा पोरांचा जीव थकून-शिणून गेला होता. कुठेतरी पडी मारणं गरजेचं होतं. गाढविण आणि पिलू हरवू नये म्हणून लोकवस्तीच्या ठिकाणी झोपायचं ठरवलं. नारायणने खंडाळा रेल्वेस्टेशनचा परिसर निवडला. एका खांबाला जनावरं बांधून खोगीरातली चादर काढून पोपट आणि नारायण झोपले. सकाळच्या उन्हाच्या कडक किरणांनी चेहरा भाजू लागला तेव्हा दोघांना जाग आली. सुदैवाने गाढविणीला त्या रात्री दूसरं गाढव दिसलं नाही.

​पाण्यानं चूळ भरून , चिवडा आणि बिलबिलीत जांभळं पोटात सारून पोरं पुण्याच्या दिशेला निघाली. घाट संपला होता. पोरांचे पथक उतरंड वेगाने पार करत गेले. कामशेटजवळ इंद्रायणी नदीत दोघांनी आंघोळी केल्या. तेच कपडे पुन्हा धुवून अंगात घातले. गाढविणीच्या पिलाला इंद्रायणीचं थंडगार पाणी पिऊन तरतरी आली. पुन्हा वरात पुढे निघाली. दुसऱ्या रात्रीचा पडाव देहूरोड मध्ये रस्त्यालगत एका बंद हॉटेलच्या आवारात पडला. दिवस उगवला तसा पुन्हा तीच पायपीट सुरू झाली. पुण्याचे शिवाजीनगर आल्यावर रात्रीचा मुक्काम स्वारगेटला करण्याचा बेत होता. कारण पुढचं अंतर कापणं सोपं होणार होतं. पण कुणी तरी स्वारगेटला जाण्यासाठी चुकीचा रस्ता दाखवला. आणि पोरांची मैल-दोन मैलाची पायपीट वाढली. अखेर एकदाचं स्वारगेट आलं आणि एस.टी. स्टॅंडच्या आवारात शेवटचा मुक्काम पडला.

शेवटचा टप्पा पार करण्यासाठी भल्या पहाटे ३-४ वाजताच पोरं आणि गाढवं उठली. खंडाळ्याचा बोरघाट ह्या बहाद्दरांनी पार केला होता. त्यामुळे दिवेघाट चढताना त्यांना दमछाक जाणवली नाही. सुर्यनारायण डोक्यावर येईपर्यंत पोपट-नारायण जबाबदारीसह वाल्हा गावात पोचले. नारायणच्या चुलतीनं पोरं आल्याचं पाहून मोठ्या मायेने डेऱ्यातलं थंडगार पाणी प्यायला दिलं. पोपटनं गाढविणीच्या अंगावरचं खोगीर रिकामं केलं. पाणी पिऊन झाल्यावर खोपटाच्या सावलीत गोधडीवर पोरं बसताना त्यांच्या पायाला आलेल्या गोळयांकडं काकूचं लक्ष गेलं. पोरांच्या तळपायांना सुद्धा फोड आले होते. वरळी ते वाल्हा असा तब्बल १४० मैलांचा प्रवास ह्या लहानग्यांनी ५ दिवसांत गाढवांसकट पार केला होता. ”आरं पोरांनो किती पायपीट केलीया ! लय दुखलं असल नव्ह ! ” काकूचं डोळं आणि काळीज भरून आलं होतं.
” नाय वं काकू , पायाचं गोळं आणि फोड बघीत बसलो असतो तर इथवर पोचलोच नसतो. दुखण्याचं लाड केलं नाय आम्ही दोघांनी बी !” पोपटचं बालबोल ऐकून काकू कळवळली.
” जेवलं की तुम्ही वाईच आडवं पडा , मी गरम तेलानं पाय चेपते तुमचे. लय आराम पडंन.आणि आज इथंच मुक्काम करायचा. चांगली झोप काढायची. मी पैकं देते इशटीला . उद्या आरामात ममईला निघा !”
काकूनं पोरांना पोटभर भाजी-भाकरी खाऊ खातली. पोपटची तर मुंबईत चिवडा आणि चण्यावर गुजराण व्हायची. भुकेल्या पोरांनी भाजी-भाकरीवर खच्चून ताव मारला. गाढविणीला आणि पिलाला पण लुसलुशीत चारा मिळाला. पोरं सावलीत आडवी झाली. काकूनं गरम तेलानं पोरांचं हातपाय चेपलं. पोरं तर कधीच झोपेच्या अधीन झाली होती.

सकाळ झाली. पुन्हा गरम पाण्याने आंघोळी झाल्या. पोपटने खोगीरात जपून ठेवलेला लेंगा आणि जुनी बंडी परतीच्या प्रवासात कामी आले. दुसऱ्या दिवशी दोन एशट्या बदलून पोपट –नारायणाने मुंबई सेंट्रल गाठलं. पोरांनी मोहिम फत्ते केल्याने नारायणचा बाप खूष झाला. पोपटच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्याने कोपरीतून पंचवीस रूपयाच्या नोटा काढल्या आणि पोपटच्या हातात टेकवल्या. चार-पाच दिवसांत एवढी मोठी कमाई झाल्याचा आनंद काही वेगळाच होता. पोपट पायी प्रवासाला विटला नसावा इतका चट्टयापट्टयाच्या चड्डीला आणि बनियनला विटला असावा. कारण पैसे मिळताच त्यांनं नवीन इजार आणि सदरा घेण्यासाठी दुकान गाठलं. एरवी सणाला सुद्धा कधी नवीन कपडे मिळत नव्हते पोपटला ! पोपटने १५ रूपयांची नवीन कापडं विकत घेऊन पहिला-वहिला आनंदोत्सव साजरा केला.
​पोपटचे कष्ट कमी झाले नाहीत. बॉम्बे केबल्स ह्या टेलीफोनच्या तारा टाकणाऱ्या कंपनीच्या कंत्राटदाराकडे पोपट कामाला लागला. दररोज पंधरा बाय अडीच फूट खड्डा खोदून ऐंशी पैसे रोजंदारी मिळायची. त्यांनं पोट भागत नव्हतं. पण दिवस हळूहळू बदलले. काही महिन्यांनी परळच्या सेंचूरी मील मध्ये स्टोअरमध्ये हलकं काम मिळालं. तिथे माल उतरवताना गोदामामध्ये येणारा ट्रक चालवण्याचा प्रयत्न केला. नंतर पोपटने वरळीच्या राजपूताना ड्रायव्हींग स्कूल मध्ये जाऊन वाहनचालकाचं लायसन्स घेतलं. मील बंद पडली पण वाहन चालवण्याचं कौशल्य आयुष्यभर उपयोगी पडलं. पोपट लवकच श्रीराम लेलेंच्या टुरीस्ट कंपनीत कामाला लागला. त्या निमित्ताने महाराष्ट्रभर प्रवासाची रंगीत तालीम झाली. जी पुढे कामी येणार होती.

​१९८०-८१ च्या सुमारास सौ. पवार म्हणजे वहिंनीकडे बदली ड्रायव्हर म्हणून जाण्याची पोपटला संधी मिळाली. संधीचं सोनं केलं आणि पवार परिवारात पोपटला जागा मिळाली. ती आजतागायत अव्याहत आहे. आज वयाच्या साठी जवळ आलेला पोपटमामा साहेबांच्या कुटूंबाच्या प्रवासाची जबाबदारी सांभाळत आहे. सुप्रिया ताईंनी राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांच्या राज्यभराच्या दौऱ्यांची धुरा पोपटमामाच वाहत आहे. वर्षभरापूर्वी पोपटरावांच्या पायाच्या घोट्याजवळचं हाड मोडलं. काही काळ इस्पितळात काढला. पण पुन्हा पोपटराव गाडी चालवण्यासाठी सज्ज झालेत. एकेकाळी गाढवं हाकणारा पोपट आता लॅंड क्रुझर दिमाखानं चालवणारे पोपटराव झालेत. दैन्यावस्थेत आसवं गाळंत बसण्यापेक्षा घामाच्या धारा गाळून कष्टाचं चीज करणारे पोपटमामाचे कौतूक करेल तितूके थोडेच ! तुम्ही-आम्ही सुद्धा पोपटमामांकडून प्रेरणाही घ्यावयास हवी. कोवळ्या वयात वरळी ते वाल्हा हा १४० मैलांचा पल्ला गाठणाऱ्या पोपटमामाला माझा सलाम !
@ सतीश ज्ञानदेव राऊत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply