Tanaji Sawant | “मोदींनी केलेली मदत म्हणजे…”; तानाजी सावंतांनी पंतप्रधान मोदींची तुलना केली थेट महादेवाशी

Tanaji Sawant | सोलापूर : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या जन्मगावी माढ्याच्या वाकावमध्ये गुंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी जोरदार भाषण केले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महादेवाशी तुलना केली आहे. कोरोना काळात भारत सरकारने अन्य देशांना केलेल्या मदतीचा संदर्भ देत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली मदत म्हणजे वैराग्याचे, महादेवाचे लक्षण आहे”, असे तानाजी सावंत म्हणाले आहेत.

तानाजी सांवत काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेवाभावी वृत्ती आहे. तुम्ही पाहिले असेल की कोरोनाकाळात अनेकांनी त्यांच्यावर राजकीय टीका केली. आपल्याकडे लसीकरणाची गरज असताना, आपल्या देशात 150 कोटी लोकसंख्या असताना तुम्ही बाहेर देशातही लसपुरवठा करत आहात, अशी टीका करण्यात आली, पण आपल्या भारताला विश्वाचा विचार करणारा नेता लाभला” असे तानाजी सावंत म्हणाले आहेत.

“मोदी यांनी जगाचा विचार केला. जगातील जनता तसेच भारतातील जनता यांच्यातील आत्मा एकच आहे. म्हणूनच आपल्या देशात औषधांचा साठा करून ठेवायचा, असा विचार मोदी यांनी केला नाही,” असेही सावंत म्हणाले आहेत.

“मोदींमध्ये वैराग्याचे, महादेवाचे लक्षण”

“मोदी यांच्यात वैराग्याचे पर्यायाने महादेवाचे लक्षण आहे. आपली हर्ड इम्यूनिटी चांगली आहे. इतर देशांवर कोरोनाचा जास्त परिणाम झाला. कित्येक देशात 30 ते 40 टक्के लोकांचा मृत्यू झाला. म्हणूनच त्यांनी लसीचा पहिला हात जगाला दिला. दुसरीकडे आपल्याकडे लसीकरणाचेही काम सुरूच होते. म्हणूनच मी म्हणतो की हे वैराग्याचे लक्षण आहे. हे तर महादेवाचे लक्षण आहे,” असे तानाजी सावंत म्हणाले आहेत.

“आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा”

“आदित्य ठाकरे यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देईन. माझ्या विभागाकडे राज्यात चार मेंटल हॉस्पिटल आहेत. चार मेंटल हॉस्पिटल पैकी एका हॉस्पिटलमध्ये आदित्य ठाकरेंसाठी बेड आरक्षित ठेवणार”, असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

आणखी काय म्हणाले तानाजी सावंत?

“महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणणं किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार निर्मितीचा फाऊंडर तानाजी सावंत होता”, असं मोठं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. “ठाकरे सरकारच्या काळात आपल्यावर अन्याय झाला होता. या अन्यायामुळे आपण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जावून नाराजी व्यक्त केली होती. ‘मातोश्री’ची पायरी कधीही चढणार नाही, असा इशारा दिला होता”, अशी माहिती तानाजी सावंत यांनी आज दिली आहे.

“2019 ला ‘मातोश्री’ समोर जाऊन माझ्यावर अन्याय का केला? असं विचारणारा तानाजी सावंत होता. मला उत्तर नाही मिळाले तर फळं भोगावी लागतील. परत मातोश्रीची पायरी चढणार नाही, असा इशारा मी ठाकरेंसमोर तेव्हाच दिला होतं. एकनाथ शिंदेंनी मला मंत्रिपदाच्या रुपातच मंत्रालयाची पायरी चढवायला लावली”, असंही तानाजी सावंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-