‘ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त आहेत’

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत सरकारची भूमिका ‘रोज खोटे बोल, पण रेटून बोल’ अशी आहे. महाविकास आघाडीचे नेते कमी आणि ‘बोलके पोपट’ जास्त बोलतात. नेते कमी बोलतात; कारण त्यांना माहीत आहे की, आपल्या चुकीमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. त्यामुळे त्यांचे बोलके पोपट मालक जसे सांगतात तसे बोलतात, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ते भाजपाच्या ‘ओबीसी जागर अभियाना’च्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. सरकारच्या वेळकाढूपणामुळे राज्यातील ओबीसी आरक्षण गेले. ओबीसींचे संपूर्ण आरक्षण संपवण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप त्यांनी केला. आमचे सरकार असताना, पाच जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांच्या वरच्या आरक्षणाविरोधातील केस आली होती. ५० टक्क्यांच्या आतल्या आरक्षणाची केसच नव्हती. तेव्हाही आम्ही ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षण वाचवण्यासाठी अभ्यास केला.

अध्यादेश काढला. तो कोर्टाला सादर केला. सुप्रीम कोर्टाने आमची बाजू मान्य केली. ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षणही मान्य करून पुढे जाण्याची मंजुरी दिली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. या सरकारला राज्य मागासवर्ग आयोग गठित करायचा होता आणि ‘इम्पेरिकल डेटा’ जमा करायचे परिपत्रक काढून सर्वोच्च न्यायालयाला द्यायचे होते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला पाहिजे तितका वेळ दिला असता; पण या सरकारने १५ महिने वाया घालवले. सात वेळा तारखा घेतल्या आणि काहीही हालचाल केली नाही.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा